गुरूंवरील दृढ श्रद्धा, भाव, उत्तम नेतृत्वगुण आणि प्रेमभाव या गुणांचा समुच्चय असणार्या पुणे येथील सौ. मनीषा पाठक (वय ४१ वर्षे) या १२३ व्या समष्टी संतपदी विराजमान !
पुणे, १४ मार्च (वार्ता.) – पुणे जिल्ह्याचे अध्यात्मप्रसाराचे कार्य पहाणार्या आणि गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा, ईश्वरप्राप्तीचा दृढनिश्चय, उत्तम नेतृत्वगुण, प्रेमभाव अशा अनेक गुणांचा समुच्चय असणार्या सौ. मनीषा पाठक (वय ४१ वर्षे) या सनातनच्या १२३ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. सौ. मनीषा पाठक या अनेक शारीरिक त्रास असतांनाही अत्यंत तळमळीने धर्मप्रसाराची सेवा करतात. सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिल्यानंतर सर्व साधक भावस्थितीत डुंबून गेले. सद़्गुरु स्वाती खाडये यांनी पू. (सौ.) मनीषा पाठक यांना पुष्पहार घालून आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रतिमा भेट देऊन सन्मान केला. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्याविषयी पाठवलेल्या संदेशाचे वाचन सद़्गुरु स्वाती खाडये यांनी केले. संदेश वाचनानंतर उपस्थित सर्व साधकांची भावजागृती झाली. चैतन्यमय वातावरणात झालेल्या या सोहळ्याचा आनंद सर्व साधकांनी ‘याची देही याची डोळा’ घेतला.
या सोहळ्यामध्ये सनातनचे बालसंत पू. वामन राजंदेकर आणि सनातनच्या संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांची वंदनीय उपस्थिती लाभली. यासह पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे पती श्री. महेश पाठक आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी मुलगी कु. प्रार्थना पाठक, आई श्रीमती सुरेखा सरसर आणि बहीण सौ. मानसी उथळे, त्यांचे यजमान श्री. मयूर अन् मुलगी चि. शरण्या उपस्थित होते.
(या सोहळ्याचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)