सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या उग्ररथ शांतीविधीच्या वेळी सौ. अंजली झरकर यांना आलेल्या अनुभूती
९.१.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांचा उग्ररथ शांतीविधी (टीप) झाला. तेव्हा सौ. अंजली झरकर यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
टीप – उग्ररथशांती : ‘वयाच्या ५० वर्षांनंतर व्यक्तींच्या इंद्रियांची क्षमता अल्प होत जाते. ती टिकून रहावी आणि दीर्घ अन् आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावे’, यासाठी वयाच्या ५० वर्षांनंतर प्रत्येक ५ वर्षांनी विधी केले जातात. वयाच्या ६० व्या वर्षी ‘उग्ररथ शांती’(साठी शांती) हा विधी केला जातो.
१. सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या उग्ररथ शांतीविधीच्या आरंभी आलेल्या अनुभूती
अ. ‘उग्ररथ शांतीविधीच्या सिद्धतेला आरंभ झाल्यापासूनच वातावरणात चैतन्य जाणवत होते.
आ. कार्यक्रमस्थळी गेल्यावर मला पुष्कळ शांत वाटत होते.
इ. माझे मन आनंदी होते.
२. उग्ररथ शांतीविधीच्या वेळी सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडे पहातांना आलेल्या अनुभूती
अ. मला सद़्गुरु राजेंद्रदादांच्या मुखमंडलावर वेगवेगळे भाव दिसून ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे वाटत होते.
आ. सद़्गुरु राजेंद्रदादांकडे पहातांना ‘माझा श्वास एका लयीत होत आहे’, असे मला जाणवले.
इ. विधीच्या वेळी सद़्गुरु राजेंद्रदादा हात जोडून आणि डोळे बंद करून नमस्कार करत असतांना मला प.पू. गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) आठवण झाली.
ई. विधीतील चैतन्य अनुभवण्यासाठी मी डोळे बंद केल्यावर ‘माझे सर्व अवयव, मन आणि बुद्धी शांत होत असून माझ्या सर्व अवयवांनाही आनंद होत आहे. सर्व अवयव कृतज्ञता व्यक्त करत आहेत’, असे मला जाणवले.
३. उग्ररथ शांतीविधीच्या दुसर्या दिवशी कार्यक्रमस्थळी गेल्यावर आलेल्या अनुभूती
३ अ. मन शांत होणे : १०.१.२०२३ या दिवशी, म्हणजे उग्ररथ शांतीविधीच्या दुसर्या दिवशी सकाळी काही कारणाने माझे मन अस्थिर झाले होते. मी सकाळच्या अल्पाहाराची सेवा करत असतांना काही वेळाने सद़्गुरु राजेंद्रदादा तिथे आले आणि मला म्हणाले, ‘‘आज कार्यक्रमस्थळी जाऊन कसे वाटते ?’, ते पहा.’’ थोड्या वेळाने तिथे गेल्यावर माझ्या मनाची अस्थिरता जाऊन ‘माझे मन पूर्ण शांत झाले’, असे मला जाणवले .
३ आ. ‘यज्ञकुंडाच्या राखेत ‘ॐ’ उमटला आहे’, असा विचार मनात येणे : मी दुसर्यांदा पुन्हा कार्यक्रमस्थळी जातांना मला आतून आवाज आला, ‘यज्ञकुंडाजवळ जाऊन पहा. आत शुभचिन्ह उमटले आहे.’ माझे पाय आपोआप यज्ञकुंडाकडेे गेले. मी यज्ञकुंडाच्या जवळ गेल्यावर मला आतून आवाज आला, ‘यज्ञाच्या राखेत ‘ॐ’ उमटला आहे.’ मी जवळ जाऊन पाहिल्यावर मला त्यात ‘ॐ’ उमटलेला दिसला.
३ इ. आध्यात्मिक बळ मिळणे : दुपारी १२ वाजेपर्यंत मी अधूनमधून ३ – ४ वेळा कार्यक्रमस्थळी गेले. तिथे गेल्यावर आध्यात्मिक बळ मिळून माझे मन शांत व्हायचे आणि मी पुन्हा सेवेला जायचे.
३ ई. मन स्थिर आणि सकारात्मक होणे : कार्यक्रमस्थळी मिळणार्या चैतन्यामुळे मी सकाळी ६ पासून दुपारी १२ पर्यंत सलग सेवा करू शकले. त्या सेवेत वेगवेगळ्या अडचणी येऊनही माझी कुणाकडून कसलीही अपेक्षा झाली नाही. मला समोर येणारी परिस्थिती सहजतेने स्वीकारता आली. देव मला चैतन्य देत होता; म्हणून मी सेवा करू शकले. यासाठी मला देवाचरणी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’
– सौ. अंजली झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१.२०२३)
|