पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील भूमापन प्रक्रिया पूर्ण करून प्रॉपर्टीकार्ड देण्यात येईल ! – शंभुराज देसाई, राज्य उत्पादन शुल्कमंत्री
मुंबई – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संस्थेमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. या संपादित क्षेत्रात निवासी, वाणिज्य, औद्योगिक, सार्वजनिक सुविधा आणि इतर प्रयोजन यांच्या भूखंडाचा ले-आऊट संमत करण्यात आलेला आहे. हे क्षेत्र प्राधिकरणाच्या कह्यात असल्यामुळे नगर भूमापन चौकशीवेळीच्या मिळकत पत्रिकांवरती (प्रॉपर्टीकार्ड) मूळ धारक पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांचे नाव घोषित करण्यात आलेले आहे. या प्राधिकरणाअंतर्गत संपादित केलेल्या भूखंडाची भूमापन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रॉपर्टीकार्ड देण्यासंदर्भात अडचणी आहेत. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून प्रॉपर्टीकार्ड देण्यात येईल. याविषयी संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन ही सुविधा लवकरच पूर्ण करण्यात येईल. या अंतर्गत आतापर्यंत ८ सहस्र ३०० भूखंडांचे ९९ वर्षांच्या भाडेपट्याने नागरिकांना वाटप करण्यात आलेले आहे, असे राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. ते विधानसभा सदस्य महेश लांडगे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते.