कौटुंबिक न्यायालयातील वाहनतळ बंद असल्यामुळे अधिवक्त्यांची गैरसोय !
पुणे – १२ ऑगस्ट २०१७ या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाच्या नूतन वास्तूचे उद़्घाटन करण्यात आले होते; पण तेव्हापासून गेली साडेपाच वर्षे कौटुंबिक न्यायालयाच्या आवारातील वाहनतळ बंद आहे. (याला उत्तरदायी असणार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक) कौटुंबिक न्यायालयाची इमारत आदर्शवत् असून वाहनतळ खुला करून देण्यासाठी वेळोवेळी अधिवक्त्यांकडून मागणीही करण्यात आली होती. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) उच्च न्यायालयाने सशुल्क वाहनतळ चालू करण्यास अनुमती दिली होती; परंतु अधिवक्त्यांंनी त्याला विरोध केला होता. वाहनतळ खुला करून न दिल्याने कौटुंबिक न्यायालयातील अधिवक्त्यांसह पक्षकारांची मोठी गैरसोय होत असून शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात वाहन लावावे लागते. तसेच वाहन लावण्यासाठी अधिवक्त्यांसह पक्षकारांना जागेच्या शोधात वणवण करावी लागत आहे. शिवाजीनगर न्यायालयाला जोडणारा भुयारी मार्गही अद्याप चालू करण्यात आला नसून भुयारी मार्ग चालू करण्याची मागणी करणारे निवेदन मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधिशांना देण्यात आले आहे. भुयारी मार्ग, तसेच कौटुंबिक न्यायालयातील वाहनतळ ३१ मार्चपर्यंत चालू न झाल्यास उपोषण करण्याची चेतावणी कौटुंबिक न्यायालयातील वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अधिवक्ता गणेश कवडे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.