अग्निहोत्र केल्याने मन:शांतीचे ध्येय साधता येते ! – डॉ. राजीमवाले, आयुर्वेद तज्ञ आणि ‘विश्व फाऊंडेशन’चे अध्यक्ष
पुणे – भारतीय वैदिक परंपरेतील पंचमहाभूतांमध्ये अग्नीचे विशेष महत्त्व आहे; कारण ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. त्यामुळे ‘अग्निहोत्रा’च्या नित्य आचरणामुळे जल, मृदा आणि वायू संवर्धनासाठी साहाय्य होते. त्याचसमवेत मन:शांतीच्या माध्यमातून मानव कल्याणाचे ध्येयही साध्य होते, असे मत आयुर्वेद तज्ञ आणि ‘विश्व फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी मांडले. ‘द सत्संग फाऊंडेशन’ आणि ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्यातून ‘सिव्हिल २०’ गटातील सदस्यांकरता ‘नदी पुनरुज्जीवन आणि पाणी’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी ‘अग्निहोत्रा’ची माहिती दिली.
राजीमवाले पुढे म्हणाले की, आधुनिक विज्ञानाच्या भाषेत ‘अग्निहोत्रा’चे महत्त्व विषद करण्याकरता काही वैज्ञानिक प्रयोग केले आहेत. मानसिक स्वास्थ्यावर होणार्या परिणामाचा अभ्यास करण्याकरता ३०० लोकांवर चाचणी करण्यात आली. त्यातील ७५ टक्के लोकांमध्ये ताणतणाव अल्प होणे, शांती मिळाल्याचे लक्षात आले. तसेच पाणी आणि हवा शुद्धीकरणासाठी प्रयोग करण्यात आले आहेत. त्यातील प्राथमिक निष्कर्ष निश्चितच सकारात्मक आहेत. अजून पुढे जात संशोधन करण्याची आमची सिद्धता असल्याची माहिती त्यांनी दिली.
संपादकीय भूमिकावैज्ञानिक प्रयोग केल्यानंतर विज्ञानापेक्षा अध्यात्मच श्रेष्ठ ठरते, हे लक्षात घेऊन साधना करा ! |