राजस्थानमधील श्री रजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्रसिंह कालवी यांचे निधन
इतिहासाचे विकृतीकरण केल्याच्या प्रकरणी ‘जोधा अकबर’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटांना केला होता विरोध !
जयपूर – राजस्थानमधील श्री रजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्रसिंह कालवी (वय ६८ वर्षे) यांचे १३ मार्चला एस्.एम्.एस्. रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. जून २०२२ मध्ये त्यांना ‘ब्रेन स्ट्रोक’ झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते.
लोकेंद्रसिंह कालवी यांचा जन्म राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील कालवी गावात झाला होता. लोकेंद्रसिंह कालवी यांनी नागौरमधून खासदारकीची निवडणूक लढवली; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर वर्ष १९९८ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर बारमेरमधून खासदारकीची निवडणूक लढवली होती; पण तेथेही त्यांचा पराभव झाला. वर्ष २००३ मध्ये त्यांनी काही राजपूत नेत्यांसमवेत सामाजिक न्याय मंचची स्थापना करून जातीवर आधारीत आरक्षणाच्या विरोधात चळवळ चालू केली होती. वर्ष २००६ मध्ये त्यांनी ‘श्री रजपूत करणी सेने’ची स्थापना केली होती. त्यानंतर चित्रपटांमधून इतिहासाचे विकृतीकरण केल्याच्या कारणावरून वर्ष २००८ मध्ये ‘जोधा अकबर’ आणि वर्ष २०१८ मध्ये ‘पद्मावत’ या चित्रपटांना लोकेंद्रसिंह कालवी यांच्या श्री रजपूत करणी सेनेने मोठा विरोध केला होता.
‘कालवी यांच्या देहावसनाने हिंदु समाज एका प्रखर नेतृत्वाला मुकला आहे’, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे. |
लोकेंद्रसिंह कालवी यांचा गोव्यातील ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त सहभाग, तसेच सनातनच्या आश्रमाला भेट !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे जून २०१८ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला उपस्थित राहून श्री. कालवी यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला पाठिंबा दर्शवला होता. या अधिवेशनात बोलतांना ते म्हणाले होते, ‘‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात करणी सेना आणि तिचे ९ लाख ९४ सहस्र सदस्य तुमच्यासमवेत खांद्याला खांदा लावून उभे आहेत. हिंदु जनजागृती समितीने ‘आम्ही काय करायचे ?’, याचा आदेश द्यावा. आम्ही सर्वजण कर्तव्य आणि धर्मकार्य म्हणून सहभागी होऊ.’’
अधिवेशनासाठी आलेले कालवी यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमालाही भेट दिली होती. या वेळी श्री. अमोल हंबर्डे यांनी कालवी यांना आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र अन् धर्म कार्याविषयी अवगत केले होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया आणि करणी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.