‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ हा महाराष्ट्राला ‘हिंदु राज्य’ बनवू शकेल…‘हिंदु राष्ट्र’ उद्या होईल !
हिंदू हा ‘हिंदु’ म्हणून एकवटला, तर केवढी अद़्भुत आणि अफाट शक्ती निर्माण होते, याचे प्रतीक म्हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा !
‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर विरोधी कायदा’ व्हावा, यांसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने मुंबई येथे २९ जानेवारी या दिवशी भव्य ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील एक मैलाचा दगड ठरावा, असा हा मोर्चा होता. याविषयी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्री. अनिल थत्ते यांनी ‘गगनभेदी’ या त्यांच्या ‘यूट्यूब’ वाहिनीवर केलेले विश्लेषण येथे देत आहोत.
१. मुंबईत निघालेला हिंदु जनआक्रोश मोर्चा, म्हणजे उफाळलेल्या ज्वाळांसह हिंदुत्वाचा पेटलेला वणवा !
मुंबईमध्ये ज्यांनी हिंदु जनआक्रोश मोर्चा आयोजित केला, त्या संयोजकांना आणि त्यात सहभागी झालेल्या सर्व धर्मयोद़्ध्यांना माझा प्रणाम आहे. जेव्हा भगवे ध्वज हातात घेऊन सहस्रो माणसे शिवाजी पार्कमधून निघाली, तेव्हा ‘हिंदुत्वाचा वणवा उफाळत्या ज्वाळांनी पेटलेला पुढे सरकतो आहे’, असे नेत्रदीपक आणि चितथरारक दृश्य दिसत होते. मुंबईमध्ये अनेक मोर्चे निघतात; पण हा हिंदु जनआक्रोश मोर्चा ज्या पद्धतीने निघाला, ते अद़्भुत होते. या मोर्च्यात आक्रमकता होती, तरी संयम होता. त्यात एक ठाम निश्चय आणि निर्धार होता. तसेच जे बिघडले आहे, ते सुधारण्याची प्रतिज्ञाबद्धताही प्रत्येकाच्या मुखावर जाणवत होती.
२. जात, संप्रदाय आणि पक्ष यांच्या पलीकडे जाऊन हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग !
या मोर्चात भाजप, शिवसेना आदी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. तरीही तो मोर्चा कुठल्याही अर्थाने आणि दुरान्वयानेही राजकीय पक्षाने काढलेला मोर्चा वाटत नव्हता, तर हिंदुत्वाचा निघालेला एक एल्गार (जोराचा लढा) वाटत होता. मुळात हिंदु समाजात जे आक्रोश, आक्रंदन आणि त्याच्या अनुषंगाने आंदोलन चालू आहे, त्याचा संदेश त्यात दिसून येत होता.
गेल्या कित्येक वर्षांपासून ‘लव्ह जिहाद’ची चर्चा होत आहे. त्यावर चिंतन आणि चिंता झाली; पण त्यासाठी रस्त्यावर येऊन धर्मयोद़्ध्यांची एक फौज निघाल्याचे दृश्य अलीकडे विविध गावांमध्ये दिसायला लागले. महाराष्ट्रात अशा प्रकारचे शक्तीप्रदर्शन यापूर्वी मराठा मोर्चांमधून पहायला मिळाले होते. नुकतेच मुंबईमध्ये त्याचे जातीच्या पलीकडे जाऊन धार्मिक अधिष्ठान असलेल्या एका जनसागरात रूपांतर झाल्याचे दिसले. ते पाहून आनंद आणि अभिमान वाटला. त्यात माझे काही मित्रही सहभागी झाले होते. त्यांचा दुरान्वयानेही कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध नाही; पण त्यांच्या मनात हिंदुत्वाची ज्योत जागृत आहे. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’, तसे प्रत्येक जण एकमेकांना सांगून या मोर्च्यासाठी आले होते.
३. मोर्च्यामुळे लोकांच्या मनामध्ये हिंदु राष्ट्राविषयी आशा निर्माण होणे
या मोर्च्याच्या यशाचे एक रहस्य, म्हणजे या मोर्च्याला प्रत्येक जण एकट्याने नाही, तर आपल्यासमवेत समविचारी लोकांचा कारवा घेऊन निघाला होता. त्यामुळे हा मोर्चा विशाल, अफाट आणि विराट असा झाला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या मोर्च्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक आशा निर्माण झाली आहे. या देशात आज ना उद्या हिंदु राष्ट्र निर्माण होईल आणि ते मोदी, शहा किंवा आदित्यनाथ हेच करतील, याविषयी कोणत्याही हिंदूच्या मनात शंका नाही.
४. उत्तरप्रदेश आणि गुजरात राज्यांची वाटचाल हिंदु राष्ट्राच्या दिशेने!
कुणाचा तरी निःपात करण्याचे बळ असलेला नेता देशामध्ये आहे. तो असतांनाच हिंदु राष्ट्राची संकल्पना साकार होऊ शकते. हिंदु राष्ट्र होईल, तेव्हा होईल; पण हिंदु राज्य निश्चित होऊ शकते. आज उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी हिंदु राष्ट्र कसे असायला हवे, याचा एक आदर्श नमुना निर्माण करण्याचे ऐतिहासिक कार्य चालू केले आहे. प्रत्येक राज्यात एका योगी आदित्यनाथ यांची आवश्यकता आहे. मोदी हे गुजरातचे उद़्गाते, प्रणेते असल्याने तेथेही एक छोटे हिंदु राष्ट्र साकारत असल्याची लोकांची भावना आहे. त्या पद्धतीने कायदे केले जात आहेत. त्या कायद्यांविषयी असलेले संभ्रम त्यांचे निराकरण करून ते राबवले जात आहेत. त्यासाठी आक्रमकता आणि युद्धसज्जता हवी, ती आज उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ दाखवत आहेत.
५. लोकेच्छेचा मान राखून महाराष्ट्र सरकारने मोर्चेकर्यांच्या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करावी !
सध्याचे लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात हिंदु राज्य आणू शकतात ना ? हा प्रश्न इच्छाशक्ती, राजकीय व्यवस्था, राजकीय सोय, राजकीय नीती, राजकीय व्यूहरचना यांचा नाही, तर धर्मनिष्ठतेचा आणि धर्माला समर्पित होण्याचा आहे. यासाठी म्हणजे धर्मासाठी जीवावर उदार व्हावे लागेल किंवा इतरही त्याग करावे लागतील. त्यासाठी निर्धार आवश्यक आहे. हिंदूंचे स्वप्न साकार करील, असा त्यांना नेता हवा आहे.
हिंदू हा ‘हिंदु’ म्हणून एकवटला, तर केवढी अद़्भुत आणि अफाट शक्ती निर्माण होतेे, हे मुंबईच्या मोर्चामुळे दिसले. हे अद़्भुत आणि एखाद्या चमत्कारासारखे होते. लव्ह जिहाद विरुद्धचा कायदा करण्यात यावा, ही या मोर्च्यातील प्रमुख मागणी होती. ती पूर्ण झाली पाहिजे, तसेच समान नागरी कायदा झाला पाहिजे. बांगलादेशींना हाकलून देणार्या कायद्याची प्रभावी कार्यवाही झाली पाहिजे. हे करण्याची त्यांच्यात शक्ती आहे. त्या शक्तीला बळ मिळण्याची आवश्यकता होती आणि ती लोकेच्छाच्या माध्यमातून सध्याच्या महाराष्ट्रातील सरकारच्या मागे भरभक्कम उभी आहे. हे मुंबईच्या हिंदु जनआक्रोश मोर्चाने सिद्ध केले आहे.
६. …तर महाराष्ट्रात ‘हिंदु राज्य’ दूर नाही !
या मोर्च्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर होणारे परिणाम निश्चितपणे दिसतील; पण राजकारणात परिणाम व्हावेत आणि त्यामागे राजकीय हेतू असावा, असे या मोर्च्यात मला अजिबात कुठेही दुरान्वयानेही दिसले नाही. त्यात ‘हिंदू एकवटला’, हीच एक भावना होती. या हिंदु जनआक्रोश मोर्च्याचे प्रत्यंतर, म्हणजे जसे मराठा मोर्चे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निघाले, तसे आज हिंदु जनआक्रोश मोर्च्याला ठिकठिकाणी प्रारंभ झाला आहे. अवघा महाराष्ट्र मनाने हिंदु राज्य झाला आणि या आक्रंदन किंवा जनआक्रोश मोर्चात जिद्दीने अन् सामूहिक पुरुषार्थाच्या भावनेने उतरला, तर हिंदु राज्य दूर नाही. आता प्रतिक्षा आहे, त्या हिंदु राज्याची !
– अनिल थत्ते, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक
(साभार : ‘गगनभेदी’ यूट्यूब वाहिनी)