‘हलाल’ रहित पदार्थ हिंदु ग्राहकांना त्वरित उपलब्ध करून द्या !
वाराणसीतील (उत्तरप्रदेश) येथे ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची जनजागृती मोहीम
वाराणसी – ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’ यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून १०० टक्के ‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीमुळे भारतातील बहुसंख्य हिंदू आणि शीख यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. देशातील केवळ १५ टक्के मुसलमान समाजाला इस्लामच्या दृष्टीकोनातून वैध असलेला ‘हलाल’ खायला देण्याच्या नावाखाली ८५ टक्के हिंदु समाजावर ‘हलाल’ लादला जात आहे. ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’ यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये ‘हलाल’ रहित पदार्थ हिंदु ग्राहकांना त्वरित उपलब्ध करून द्यावेत, यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने वाराणसीतील आयपी मॉलसमोर जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या वेळी येथील ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’, ‘बर्गर किंग’ आणि ‘पिझ्झा’ या आस्थापनांच्या व्यवस्थापकांना हलालविरोधी पदार्थ उपलब्ध करून देण्याविषयी निवेदन देण्यात आले. तसेच आस्थापनाच्या दुकानांमध्ये ‘हलाल’ आणि ‘नॉन हलाल’ असे पदार्थ उपलब्ध आहेत’, असे स्पष्टपणे दिसणारे ‘माहितीफलक’ लावावेत’, अशीही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
या मोहिमेत वाराणसी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री. अजितसिंग बग्गा, महमूरगंज व्यापारी मंडळाचे श्री. चंद्रकांत अग्रवाल, हिंदु महासभेचे श्री. शुभम् पांडे, महावीर सेनेचे श्री. अरविंद गुप्ता, काशी बिस्कीट आणि मिठाई व्यापारी मंडळाचे पदाधिकारी श्री. आनंद त्रिपाठी आणि श्री. प्रतीक त्रिपाठी, तसेच उत्तरप्रदेश अन् बिहार हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी आणि श्री. राजन केशरी आदी मान्यवर उपस्थित होते.