हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात कराचीमध्ये ३० मार्चला विधानभवनावर मोर्चा
कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंच्या संदर्भात सातत्याने अपहरण, धर्मांतर, अल्पवयीन मुलींचे मुसलमानांशी बलपूर्वक विवाह करणे आदी वाढत्या घटना पहाता येत्या ३० मार्च या दिवशी हिंदू सिंधच्या विधानभवनावर मोर्चा काढणार आहेत. अल्पसंख्यांकांच्या अधिकारासाठी कार्य करणार्या ‘पाकिस्तान दारावर इत्तेहाद (पीडीआय)’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
Pakistan: अत्याचार के खिलाफ हिंदुओं का मार्च, पाकिस्तान में क्यों बढ़ रही हैं जबरन धर्मांतरण-अपहरण की घटनाएं?#Pakistan https://t.co/K8NTjbfBBo
— Amar Ujala (@AmarUjalaNews) March 14, 2023
या संघटनेचे अध्यक्ष फकीर शिवा कुची यांनी सांगितले की, या मोर्च्यामध्ये सहस्रो हिंदू सहभागी होतील, अशी अपेक्षा आम्ही करत आहोत; कारण आमच्या महिला आणि मुली यांचे होणारे अपहरण, धर्मांतर अन् विवाह यांच्याविषयी सरकार डोळे मिटून बसले आहे. या संदर्भात जागृती करण्यासाठी हिंदूंनी संपूर्ण सिंध प्रांतामध्ये लहान फेर्या काढणे चालू केले आहे. आमची मागणी आहे की, सिंधच्या विधानसभेत बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह यांच्या विरोधात बनवण्यात आलेले विधेयक लवकर संमत करण्यात यावे.
वर्ष २०१९ मध्ये आणले होते विधेयक !
सिंध प्रांतातील विविध जिल्ह्यांतील हिंदु मुलींचे अपहरण आणि धर्मांतर यांचे सूत्र विधानसभेत वर्ष २०१९ मध्ये उपस्थित करण्यात आले होते. यावर चर्चा होऊन काही सुधारणा करून विधेयक संमतही करण्यात आले होते; मात्र नंतर हे विधेयक केवळ हिंदु मुलींच्याच संदर्भात सीमित न ठेवता सर्वांना सहभागी करण्याची मागणी करत फेटाळण्यात आले होते. वर्ष २०२१ मध्ये पुन्हा याच प्रकारचे विधेयक आणण्यात आले, तेही फेटाळण्यात आले होते.