उत्तरप्रदेशात एका उच्चशिक्षित युवतीने केला भगवान श्रीकृष्णाशी विवाह !
उरई (उत्तरप्रदेश) – येथील विधी महाविद्यालयात शिकणार्या एका मुलीने भगवान श्रीकृष्णाशी विवाह केला. ब्राह्मणांनी केलेल्या मंत्रोच्चारात युवतीने विधीपूर्वक सात फेरे घेतले. या वेळी युवतीच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. या विवाहात मुलीच्या आई-वडिलांनी कन्यादानही केले. मुलीचे आई-वडील भगवान श्रीकृष्ण त्यांचा जावई झाल्याविषयी फार आनंदी आहेत. ते म्हणतात की, भगवान श्रीकृष्ण आता त्यांचे नातेवाईक झाले असून ते त्याची जावयाच्या रूपात पूजा करणार.
Woman marries Lord Krishna in #Auraiya https://t.co/Jxc1GvWKuK pic.twitter.com/thw3JQTXfa
— The Times Of India (@timesofindia) March 14, 2023
उरई येथे रहाणारी ३० वर्षांची रक्षा ही ‘एल्.एल्.बी.’चे शिक्षण घेत आहे. रक्षा लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णाची भक्ती करत आहे. रक्षा केवळ भगवान श्रीकृष्णावर प्रेम करायची. तिच्या लग्नासाठी तिच्या कुटुंबियानी आणलेली स्थळे ती वारंवार नाकारत होती. एके दिवशी रक्षाने कुटुंबियांना सांगितले की, तिच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले होते. स्वप्नातच श्रीकृष्णाला पती मानून तिने त्याला हार घातला. मुलीच्या जिद्दीपुढे आई-वडील काहीच बोलू शकले नाहीत आणि त्यांनी मुलीच्या आनंदासाठी तिच्या लग्नाला होकार दिला. घरच्यांची अनुमती मिळाल्यानंतर ११ मार्च २०२३ या दिवशी रक्षाचा विवाह भगवान श्रीकृष्णाशी हिंदु संस्कृतीनुसार पार पडला. रक्षाच्या हातावर मेहंदी, बांगड्या दिसत होत्या. विवाहासाठी विशेष मंडप सजवण्यात आला होता. भगवान श्रीकृष्णाच्या रूपात वर मिळाल्याने रक्षा फार आनंदी असून मथुरेशी नाते जोडले गेल्याने रक्षाचे नातेवाईकही फार आनंदी आहेत.