दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ‘ईडी’कडून अटक !
‘साई रिसॉर्ट’च्या अवैध बांधकामाला अनुमती दिल्याचा ठपका !
दापोली – तालुक्यातील मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांची चौकशी केली. त्यानंतर दोन दिवसांनंतरच ‘ईडी’ने ही माजी प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना १४ मार्चला अटक केली. देशपांडे यांच्यावर साई रिसॉर्टच्या बांधकामासाठी अवैध अनुमती दिल्याचा आरोप आहे. जयराम देशपांडे यांना ‘ईडी’ने अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे.
तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्ट हे रत्नागिरी जिल्ह्याचे ठाकरे गटाचे नेते तथा माजी पालकमंत्री अधिवक्ता अनिल परब यांचे असल्याचा आरोप भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वारंवार केला आहे. तर साई रिसॉर्टशी स्वत:चा कुठलाही संबंध नसल्याचे अधिवक्ता अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, साई रिसॉर्ट प्रकरणी शासनाने तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचे निलंबन केले आहे. शासनाकडून हा आदेश २३ जानेवारी या दिवशीच काढण्यात आला आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात तत्कालीन देशपांडे यांची चौकशी होणार आहे. निलंबनाच्या कालावधीत देशपांडे यांनी खासगी नोकरी किंवा व्यवसाय केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. देशपांडे हे सध्या रायगड येथील रोजगार हमी योजनेच्या उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
दापोली रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना २० मार्चपर्यंत दिलासा
न्यायालयाकडून ‘ईडी’ला कठोर पावले न उचलण्याचे निर्देश
मुंबई – उच्च न्यायालयाने ठाकरे गटाचे आमदार अधिवक्ता अनिल परब यांना दिलासा दिला आहे. त्यांच्यावर दापोली रिसॉर्ट ‘मनी लॉन्ड्रींग’ प्रकरणी २० मार्चपर्यंत कोणतीही कठोर पावले उचलून नयेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडीला) दिले आहेत.
दापोलीतील साई रिसॉर्ट संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ‘ईडी’ने उद्योजक सदानंद कदम यांना अटक केली. यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ‘आता अनिल परब यांना अटक करण्यात येईल’, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे परब यांनी स्वतःवरील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले.