गोव्यात सलग नवव्या दिवशी वनक्षेत्रांमध्ये आग कायम ८ ठिकाणी आग अजूनही सक्रीय
पणजी, १३ मार्च (वार्ता.) – गोव्यातील वनक्षेत्रांमध्ये नवव्या दिवशीही आग धुमसत आहे. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार मोले राष्ट्रीय उद्यानात सुर्ला -१ विभागात, राष्ट्रीय उद्यानात सुर्ला – २ विभागात, पोत्रे-नेत्रावळी, नेत्रावळी अभयारण्यात कुमरी भागात, कोपर्डे-वाळपई, शिगाव, कुर्डी-कोळंब आणि ओकांबी, पिळये या ठिकाणी १३ मार्च या दिवशी सकाळी ८ वाजता आग धुमसत होती; मात्र आगीचा प्रक्षोभ उणावला आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ४८० कर्मचारी आणि नागरिक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Three fires are currently active as of 10 p.m. on March 13, 2023.
*ACTIVE FIRE*
(Minor, close monitoring on)1. Potrem Netravali-Govt. Forest
2.Derodem dongor – Govt. Forest
3.Paguchi Dongre- Sanguem – Govt. Forest@PMOIndia @byadavbjp @moefcc— VishwajitRane (@visrane) March 13, 2023
वणव्यामुळे जंगलातील दुर्मिळ प्रजातींवर संकट
सह्याद्री अर्थात पश्चिम घाटाला जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध आणि संपन्न असलेले जगातील आठवे स्थान मानले जाते. गोवा हा सह्याद्री घाटातील मथला भाग (कॉरिडोर) आहे. गोव्यात गेले १० दिवस चालू असलेल्या वनक्षेत्रांतील आगींमुळे जंगलातील अनेक स्थानिक वृक्षवल्ली, पक्षी आणि प्राणी यांच्यावर संकट कोसळले आहे. शेकडो वर्षांचा हिरवागार पट्टा आणि पर्यावरणीय चक्र यांचे क्षणाधार्थ राखेत रूपांतर झाले. वनातील शेकडो वर्षे जुन्या झाडांची राख झाली. दुर्गम आणि डोंगराळ भागांत उगवणारी दुर्मिळ वनस्पती कायमची नष्ट झाली आहे. आता या ठिकाणची जागा निर्सगाला घातक असणारे घाणेरी, गाजर गवत सारखे तण (वीड) घेण्याची शक्यता आहे. कारण हे तण आगीला दाद देत नाहीत, अशी खंत वनक्षेत्रांत आग विझवण्यासाठी गेलेले कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
उन्हाळ्याच्या दृष्टीने वन खात्याच्या पूर्वसिद्धतेवर प्रश्नचिन्ह
वनक्षेत्रांमध्ये आग विझवण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी वन खात्याच्या वतीने उन्हाळ्याच्या दृष्टीने करण्यात येणार्या पूर्वसिद्धतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उन्हाळ्यात वनक्षेत्रांना आग लागू नये, यासाठी हिवाळ्यात वनांमध्ये ‘फायर लाईन’ सिद्ध केली जाते. वनक्षेत्राला आग लागल्यास ती ‘फायर लाईन’च्या पुढील भागात जाऊ शकत नाही. आता वन खाते वनांमध्ये ‘फायर लाईन’ सिद्ध करतांना दिसत आहे.
म्हादई अभयारण्य आणि सत्तरी वन क्षेत्रांतील बहुतांश आग आटोक्यात
म्हादई अभयारण्य आणि सत्तरी वन क्षेत्रांतील बहुतांश आग आटोक्यात आली आहे; मात्र देरोडे येथील आग अजूनही धुमसत आहे. ही आग कर्नाटक राज्यात पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी पिसुर्ले येथील खाणीच्या खंदकातील पाणी वापरले जात आहे. हॅलिकॉप्टरच्या साहाय्याने ही आग विझवण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी नौदल, वन खाते, अग्नीशमन दल आणि स्थानिक नागरिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत.