‘उपराकार’ ‘उपरे’च का ?
भाजपचे आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत हिंदु धर्माविषयी स्वाभिमान व्यक्त करत हिंदु-दलित असल्याचे विधान केले, तसेच ‘माझे वडील जोडे (चप्पल) शिवत होते’, याचा मला अभिमान आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण मिळाल्याने मी आमदार झालो’, हे स्पष्ट करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. याचे पडसाद पश्चिम महाराष्ट्रात उमटले आणि पवार यांच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलने, मोर्चे, पत्रकार परिषदा घेण्यास प्रारंभ केला.
सातारा येथे शरद पवार यांचे खंदे समर्थक तथा ‘उपराकार’ कादंबरीचे लेखक लक्ष्मण माने यांनी आमदार राम सातपुते यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. यामुळे त्यांची वैचारिक दिवाळखोरी आणि त्यांच्यावर झालेले संस्कार समोर आले. लक्ष्मण माने म्हणाले, ‘‘डॉ. आंबेडकर यांनी जीवनभर सनातन हिंदु धर्माचा विरोध करून त्याची चिकित्सा केली. त्यांनी हिंदु धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला; मात्र त्याच डॉ. आंबेडकर यांचे नाव घेऊन सनातन हिंदु धर्माचा अभिमान असल्याचे बोलले जात आहे. आमदार राम सातपुते यांचे हे वाक्य म्हणजे गटारात लोळणार्या डुकराने अभिमानाने ‘होय मी डुक्कर आहे आणि गटारातच माझा स्वर्ग आहे, याचा मला अभिमान आहे’, असे म्हणण्यासारखे आहे. धर्माच्या नावाखाली उच्चवर्णियांनी सहस्रो वर्षे बहुजन समाजाला अमानवी जीवन जगण्यास भाग पाडले आणि त्यांचे शोषण केले. जोपर्यंत जातीव्यवस्थेचा पुरस्कार करणारे आहेत, तोपर्यंत संघाच्या लोकांना कायमच तुपाबरोबर जेवता येणार आहे. त्यामुळे राम सातपुते यांना डॉ. आंबेडकर यांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही.’’
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाच्या धार्मिक स्वातंत्र्याचा आदर करत धर्माचरणाचा घटनादत्त अधिकार प्रदान केला आहे. त्यामुळे लक्ष्मण माने यांना सनातन हिंदु धर्माचा तिरस्कार करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, तसेच सनातन हिंदु धर्माची गटाराशी तुलना करून माने यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रकार केला आहे. समाजात जातीद्वेषाच्या भिंती निर्माण करून मतांच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याचा उद्योग अधिक काळ टिकत नाही, हे माने लक्षात घेतील का ? स्वत:च्या लेखणीतून हिंदु धर्माविषयी सतत गरळओक करणारे ‘उपराकार’ मला सनातन हिंदु धर्माने कसे ‘उपरे’ ठेवला आहे, हे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न तर करत नाहीत ना ?
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा