जीवामृत (टीप) हे खत नसून सूक्ष्म जीवाणूंचे विरजण आहे !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ९५
‘सुभाष पाळेकर कृषी’ या शेतीतंत्राने लागवड करतांना कुठल्याही खताचा उपयोग केला जात नाही. केवळ जीवामृत (टीप) आणि घनजीवामृत वापरले जाते. भूमीमध्ये (मातीत) वनस्पतींना आवश्यक अशी सर्व प्रकारची अन्नद्रव्ये (खनिजे) असतात; पण वनस्पती थेट शोषून घेतील, अशा स्वरूपात ती नसतात. मातीतील खनिजे वनस्पती शोषून घेऊ शकतील, अशा स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे काम सूक्ष्म जीव करतात. देशी गायीच्या शेणात असे असंख्य उपयुक्त सूक्ष्म जीव असतात. मातीत सूक्ष्म जिवांची संख्या वाढावी; म्हणून देशी गायीचे शेण अन् गोमूत्र यांचा उपयोग करून बनवलेले जीवामृत वापरतात.
जीवामृत हे खत नसून अनंत कोटी सूक्ष्म जीवाणूंचे विरजण आहे. ज्याप्रमाणे पातेलेभर दुधात एक चमचा दही किंवा ताक घातले, तरी सर्व दुधाचे दही होते; त्याचप्रमाणे जीवामृत अल्प प्रमाणात उपयोगात आणून संपूर्ण शेतातील उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या पुष्कळ प्रमाणात वाढवता येते. ‘रायझोबियम’, ‘अॅझेटोबॅक्टर’, असे जीवाणू झाडांना नत्र (नायट्रोजन) उपलब्ध करून देतात. ‘बॅसिकस सिलीकस’ हे जीवाणू झाडांना पालाश (पोटॅशियम) उपलब्ध करून देतात आणि ‘अॅसिटो डायझोट्रॉपिकस’ हे जीवाणू वनस्पतींच्या पानांवर पसरून हवेतील नत्र पानांना उपलब्ध करून देतात. असे अनेक उपयुक्त जीवाणू देशी गायीच्या शेणात मोठ्या संख्येने असतात. जीवामृत करतांना त्यात वापरलेल्या बेसनामुळे जीवाणूंना प्रथिने मिळतात अन् गुळामुळे ऊर्जा मिळते आणि यामुळे शेणातील जीवाणूंची संख्या कित्येक पटींनी वाढते.
एक चौरस फूट क्षेत्राला १० – १५ दिवसांतून एकदा १०० मि.ली. जीवामृत दिले जाते. जीवामृत देतांना ते १: १० या प्रमाणात पाणी घालून पातळ केलेले असते. जीवामृताच्या नियमित उपयोगाने मातीची सुपीकता वाढत जाते.
टीप – देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्यापासून बनवलेले एक मिश्रण.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२८.२.२०२३)