नाटू नाटू !
अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरातील एका सभागृहात ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला आणि त्यात ‘नाटू नाटू’ या ‘आर्आर्आर्’ चित्रपटातील गाण्याला ‘ओरिजिनल साँग’ या श्रेणीमध्ये ‘सर्वोत्कृष्ट गाणे’ म्हणून पुरस्कार मिळाला, तर ‘दी एलिफंट व्हिस्परर्स’ या गुनीता मोंगा यांनी निर्मित केलेल्या माहितीपटाला ‘सर्वोत्कृष्ट माहितीपटा’चा पुरस्कार मिळाला. एखाद्या भारतीय माहितीपटाला पुरस्कार मिळणे, हे दुसर्यांदा घडले आहे. याचा आनंद भारतियांना अधिक झाला पाहिजे. ‘नाटू नाटू’ गाण्याला पुरस्कार मिळणार, असे वाटतच होते. यापूर्वीच या गाण्याला ‘गोल्डन ग्लोब’चाही ‘ओरिजिनल साँग’ या श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून पुरस्कार मिळाला होता. यापूर्वी ‘जय हो’ या ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील गाण्यासाठी ए.आर्. रहमान यांना हा पुरस्कार मिळाला होता; मात्र हा विदेशी निमार्र्त्यांचा चित्रपट होता. ‘नाटू नाटू’ हे पूर्णपणे भारतीय चित्रपटातील भारतीय गाणे आहे, हे लक्षात घ्यायला हवे. भारतियांना ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळाल्याचे नवीन नाही. यापूर्वी भानू अथय्या, सत्यजित रे, ए.आर्. रहमान, गुलजार, रेसुल पोकुट्टी यांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळालेले आहेत. असे जरी असले, तरी भारतीय चित्रपटसृष्टीच्या जवळपास १०० वर्षांच्या इतिहासात अद्याप एकाही भारतीय चित्रपटाला ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळालेला नाही, ही वस्तूस्थिती आहे.
भारतीय चित्रपटांना ऑस्कर का मिळत नाही ?
अनेक भारतीय चित्रपट आतापर्यंत ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आले होते आणि येत आहेत; मात्र त्यांना नामांकनही मिळत नाही, असेही लक्षात येत आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतीय चित्रपट मागे आहेत, त्यांचे तंत्रज्ञान मागे आहे, असे आताच्या स्थितीवरून तरी म्हणता येणार नाही. तरीही ‘भारतीय चित्रपटांना पुरस्कार का मिळत नाही ?’, याचाही विचार चित्रपटसृष्टीने करण्याची आवश्यकता आहे. ‘ऑस्कर पुरस्कार मिळाला म्हणजे तो चित्रपट चांगला आहे’, असेही कुणी म्हणू शकत नाही आणि चित्रपटाची गुणवत्ता ठरवण्याची ती फूटपट्टीही असू शकत नाही. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यांचे भारतियांनीच नाही, तर विदेशी लोकांनीही कौतुक केले. चीनसारख्या देशातही भारतीय चित्रपटांचे कौतुक झाले आहे, हे विशेष ! यापूर्वी ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला; मात्र यात ‘भारताच्या गरिबीचे, झोपडपट्टीचे प्रदर्शन मांडून त्या आधारे भारताची हेटाळणी करण्यासाठी तो दिला गेला कि काय ?’, अशी शंका अनेकांच्या मनात आली होती. या चित्रपटाची निर्मिती विदेशी निर्मात्याने केली होती. भारत म्हटला की, गरिबी आणि झोपडपट्टी अशी प्रतिमा विदेशात रंगवण्यात आलेली आहे. ‘नाटू नाटू’ हे गाणे ज्या ‘आर्आर्आर्’ चित्रपटातील आहे, त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली असून त्यांच्या ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. भारतातून ‘बाहुबली २’ ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता; मात्र त्याला नामांकनही मिळाले नव्हते. यापूर्वी ‘मदर इंडिया’, ‘सलाम बाँबे’ आणि ‘लगान’ या चित्रपटांना नामांकन मिळाले होते; मात्र ते पुरस्कार मिळवू शकले नव्हते. ‘मदर इंडिया’ आणि ‘लगान’ हे भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचे दगड ठरले आहेत. अशांना ऑस्कर मिळाला असता, तरच ते मोठे झाले असते, असे भारतियांना अजिबात वाटत नाही. ‘भारतीय चित्रपटांना ऑस्कर मिळायलाच हवा’, असाही भारतियांचा अट्टहास असणार नाही, तरीही ‘भारतियांना हा पुरस्कार का मिळत नाही?’, याचा विचार होणे आवश्यक आहे. भारतीय चित्रपट म्हणजे केवळ हिंदी चित्रपट, असे कुणी गृहीत धरू नये, तर मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, कन्नड या भाषांतही चांगले आशय असणारे चित्रपट बनवण्यात येतात. सत्यजित रे यांच्या बंगाली चित्रपटांना विदेशी पुरस्कार मिळालेले आहेत. ‘संत तुकाराम’ या वर्ष १९३६ मधील मराठी चित्रपटालाही ५ व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला होता. ‘श्वास’ हा मराठी चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता.
चित्रपटांतून जागृती होणे आवश्यक !
चित्रपट हे जागृतीचे उत्कृष्ट माध्यम आहे. त्याचा योग्य वापर करण्याची कला आणि बुद्धी असणे आवश्यक आहे. कोणत्याही चांगल्या विचारांच्या चित्रपटाला लोक प्रतिसाद देतात, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘जय संतोषी माता’ या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोक संतोषीमातेची साधनाही करू लागले होते, हे लक्षात घ्यायला हवे. आध्यात्मिक, राष्ट्रीय, सामाजिक आदी विविध विषय हाताळून जनतेवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न यातून होणे आवश्यक आहे. यासाठी केंद्रीय परिनिरीक्षण मंडळाने नियमावली बनवणे आवश्यक आहे. अश्लीलता, बीभत्सता, हिंसाचार, हत्या, बलात्कार आदी समाजाला हानीकारक असणार्या गोष्टींचे अधिकाधिक प्रदर्शन करून चित्रपटाच्या शेवटी एक छोटासा विचार देऊन समाजात जागृती होणार नाही, तर अधिकाधिक चांगले विचार चित्रपटातून प्रेक्षकांसमोर जाणे आवश्यक आहे. दूरदर्शनवर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ चालू करण्यात आल्यावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. ‘तान्हाजी’, ‘द कश्मीर फाइल्स’ अशाही चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. यातून खरा इतिहास जनतेसमोर आला आणि राष्ट्रजागृतीही झाली. अशांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. अशांना केंद्रशासनाकडूनही पुरस्कार दिले जात आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. ऑस्कर मिळण्यापेक्षा ‘देशातील जनतेला आपण काहीतरी संदेश देत आहोत’, हे अधिक महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात अशा प्रकारचे काही चित्रपट येऊ लागले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. केवळ आर्थिक लाभ मिळवणे हा चित्रपट निर्मितीचा उद्देश नसावा. क्षेत्रपाल देवतेवर आधारित ‘कांतारा’सारखे चित्रपट लोकांना आवडत आहेत. चित्रपट केवळ दोन घटकेचे मनोरंजन नाही, हे जनतेने आता लक्षात ठेवले पाहिजे. अशा प्रामाणिक विचारांतून चित्रपट बनले, तर अशांना ऑस्कर मिळाल्याविना रहाणार नाही !
कुठल्याही पुरस्कारापेक्षा चित्रपटांद्वारे लोकजागृती होणे अधिक महत्त्वाचे ! |