महाराष्ट्र शासनाच्या वतीने पंढरपूर येथे २० दिवसांचे शाहिरी प्रशिक्षण शिबिर !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – महाराष्ट्राची शान असलेल्या शाहिरी लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी येथे राज्यस्तरीय शाहिरी प्रशिक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून १२ ते ३१ मार्च या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १२ मार्च या दिवशी येथील सद़्भावना भवन येथे दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद़्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सभापती सोमनाथ अवताडे, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, लोककलावंत भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष रमेश खाडे, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष शाहीर विजय व्यवहारे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये राज्यातून २१ शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. शिबिरामध्ये महाराष्ट्रातील नामवंत २० शाहीर २० दिवस प्रशिक्षक, व्याख्याते म्हणून उपस्थित राहून प्रशिक्षण देणार आहेत. शिबिराच्या उद़्घाटनानंतर व्याख्याते म्हणून ज्येष्ठ शाहीर बाळासाहेब मालूसकर यांनी पारंपरिक शाहिरी लोककलेचे महत्त्व, शाहिरी परंपरा यांविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिक पोवाडे सादर करून प्रशिक्षण दिले.