पंढरपूरमधील तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा यांचे मंदिर कोसळले !
निकृष्ट कामाची चौकशी करण्याची सामाजिक संघटनांची मागणी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – ४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले संगमरवरी तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा यांचे संगमरवरी मंदिर कोसळले. वार्यामुळे मंदिर कोसळल्याचा दावा वन विभागाच्या अधिकार्यांनी केला आहे. ‘या निकृष्ट कामाची आणि संपूर्ण तुळशी वृंदावनात करण्यात आलेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी’, अशी मागणी भाविक आणि सामाजिक संघटना यांनी केली आहे. चौकशीचे आश्वासन पंढरपूरच्या वन क्षेत्र अधिकारी चैत्राली वाघ यांनी दिले.
४ वर्षांपूर्वी तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून यमाई तलावाच्या शेजारी कोट्यवधी रुपये व्यय करून तुळशी वृंदावन सिद्ध केले आहे. ४ वर्षांतच मंदिर कोसळल्याने भाविक अप्रसन्न आहेत. येथे श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीसमवेतच जगद़्गुरु संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत जनाबाई, संत नामदेव महाराज यांचीही मंदिरे उभारून त्यात मूर्ती बसवलेल्या आहेत. त्या मंदिरांनाही धोका निर्माण होण्याची भीती आहे.