‘विजयदुर्ग’च्या दुरवस्थेविषयी जिल्हाधिकार्यांनी कार्यवाही करावी ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक ‘विजयदुर्ग’ची दुरवस्था रोखून त्याचे संवर्धन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन
मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा, राष्ट्रीय स्मारक असणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘विजयदुर्ग’ हा महाराष्ट्राची अस्मिता आहे; मात्र छत्रपतींच्या महाराष्ट्रात असलेल्या या दुर्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या दुर्गाची होत असलेली दुरवस्था रोखून त्याचे संवर्धन करावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर यांना देण्यात आले. त्यानंतर श्री. केसरकर यांनी ‘सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकार्यांनी वस्तूस्थिती पडताळून आवश्यक ती कार्यवाही करावी’, असे निर्देश दिले. हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी हे निवेदन दिले. या वेळी समितीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कोकणातील विजयदुर्ग किल्ला ढासळतोय
हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, दुर्गाची पहिली तटबंदी अनेक ठिकाणी ढासळली आहे. १ वर्षाहून अधिक काळ लोटला, तरी त्याची डागडुजी केलेली नाही. त्याची पहाणी करण्यासाठी राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी येथे येऊन गेले. पुरातत्व खात्यानेही या संदर्भात आश्वासने दिल्याचे कळते; मात्र अद्यापही या तटबंदीचे काम करण्यात आलेले नाही. दुर्गाच्या महाद्वाराला दरवाजेच नाहीत. दुर्गाच्या तटबंदीवर एक वर्षांपूर्वी कोसळलेला वड त्याच स्थितीत आहे. वड कोसळून तटबंदी दुभंगली आहे. दुर्गाचा परिसर पहात असतांना अनेक ठिकाणी झाडांची पाळेमुळे बुरुज आणि तटबंदी यांत घुसून ते कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
दर्या बुरुजाच्या तटबंदीचा तळाकडील भाग समुद्राच्या पाण्यामुळे आतपर्यंत पोखरला गेला असून बुरुज कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. धुळपांचे भुयार बुजलेल्या स्थितीत आहे. भुयारी मार्ग मोकळा केल्यास तेथे शिवकालीन इतिहासातील बर्याच गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. विजयदुर्गमध्ये अनेक ठिकाणी पडझड झाल्याने हा दुर्ग पहायला जाणार्या दुर्गप्रेमींची मान लाजेने खाली जाते. दुर्गाच्या संवर्धनासाठी असलेल्या पुरातत्व खात्याची अनास्था चीड आणणारी आहे. राज्यातील गडकोट हा आपला ऐतिहासिक वारसा असून हिंदु जनजागृती समितीने राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेतली आहे. विजयदुर्गाच्या संवर्धनासाठी प्रशासनाने तातडीने कृती करणे आवश्यक आहे.
विजयदुर्ग ऐतिहासिक दुर्गाच्या माहितीचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याविषयी अभ्यास करून निर्णय घेऊ ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्रीहिंदवी स्वराज्याच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या ‘विजयदुर्ग’ या ऐतिहासिक किल्ल्याच्या माहितीचा पाठ्यपुस्तकात समावेश करून मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास जनतसमोर आणण्यासाठी शासनस्तरावर ठोस कृती करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी शालेय शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर यांना दिले. त्या वेळी श्री. केसरकर यांनी ‘ही माहिती पडताळून त्याचा अहवाल सादर करावा’, असे निर्देश शालेय शिक्षण सचिवांना दिले. श्री. केसरकर या वेळी म्हणाले, ‘‘विजयदुर्ग’ किल्ल्याचा इतिहास कसा शिकवता येईल’’, याविषयी निर्णय घेण्यात येईल. |