हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कायदेशीर लढा देऊ ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.
विरोधानंतरही मंगळुरू येथे यशस्वीपणे पार पडली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
मंगळुरू (कर्नाटक), १३ मार्च (वार्ता.) – हिंदु राष्ट्र सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कायदेशीर लढा देऊ. आपण सर्व हिंदुत्वाच्या सूत्रांतर्गत एक होऊया, असे आवाहन कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी केले. ते १२ मार्च या दिवशी येथील कद्रि मैदानावर हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या सभेचे वक्ता म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनेश जैन, हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा आणि सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै उपस्थित होत्या.
या सभेत सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा, सनातन संत पू. विनायक कर्वे आणि पू. राधा प्रभु, तसेच सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या सभेत १ सहस्राहून अधिक धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते, तसेच २ सहस्र हिंदूंनी ऑनलाईन माध्यमातून सभा पाहिली. या सभेत धर्मांथ एस्.डी.पी.आय.ने विरोध दर्शवला होता. या विरोधानंतरही ही सभा यशस्वीपणे पार पडली.
सर्व हिंदूंनी जन्महिंदू नाही, तर कर्महिंदू बनावे ! – श्री. दिनेश जैन
सर्व हिंदूंनी जात, पंथ, परंपरा आणि संघटना बाजुला ठेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एक व्हावे. हिंदु राष्ट्राची स्थापना कोणत्याही राजकीय पक्षाकडून होऊ शकत नाही. केवळ संघटित हिंदूच हे महान कार्य करू शकतात. त्यासाठी सर्व हिंदूंनी केवळ जन्महिंदू नाही, तर कर्महिंदू बनणे आवश्यक आहे.