लंडनमधील राहुल गांधी यांच्या विधानावरून संसदेत गदारोळ !

नवी देहली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी लंडन येथे भारताच्या संदर्भात केलेल्या विधानावरून गदारोळ झाला. यामुळे दुपारी २ पर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. त्यानंतर चालू झालेल्या कामकाजातही गदारोळ चालूच होता.

राहुल गांधी यांच्या विधानावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपने विरोधकांना, तसेच काँग्रेसला धारेवर धरले. केंद्रीय मंत्री पियूष गोयल म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी संसदेत येऊन क्षमा मागावी.’

काय म्हणाले होते राहुल गांधी ?

राहुल गांधी यांनी केंब्रिज विश्‍वविद्यालयात म्हटले होते की, भारतात संसदेत माईक बंद केले जातात. विरोधक आवाज उठवू शकत नाही. विरोधी पक्षांचा कोणताही नेता कोणत्याही विश्‍वविद्यालयात जाऊन बोलू शकतो; परंतु तो संसदेच्या सभागृहात बोलू शकत नाही. भारतातील लोकशाहीवर आक्रमण होत आहेे. (विदेशात जाऊन वारंवार भारताची अपकीर्ती करणार्‍या राहुल गांधी यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात का टाकले जात नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • संसदेचे कामकाज गदारोळ न होता झाले, असा एकतरी दिवस गेला आहे का ? याला उत्तरदायी असणार्‍यांना ज्या प्रमाणे शाळेत वर्गातून बाहेर काढले जाते, तसे बाहेर का काढले जात नाही ?
  • विद्यार्थ्यांना शिस्त लावली जाते, तर खासदारांना कधी लावणार ? जनतेच्या करातून पोसण्यात येत असलेले असे बेशिस्त खासदार जनतेचे कधीतरी आदर्श असू शकतात का ?