संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार ! – नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री

मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गाची हवाई पहाणी

पत्रकार परिषदेत बोलतांना मंत्री नितीन गडकरी, खासदार रणजितसिंह नाईक (डावीकडे) आणि अन्य अधिकारी

पुणे, १२ मार्च (वार्ता.) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल, तसेच पुढील वर्षीच्या प्रारंभी त्याचे उद्घाटन होऊन मार्ग चालू होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्यांनी देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे जाणार्‍या पालखी मार्गांची हवाई पहाणी केली. यामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केल्या जाणार्‍या कामांची त्यांनी पहाणी केली. कामाचा आढावा घेतल्यानंतर येत्या मे मासापर्यंत या दोन्ही मार्गांचे मिळून अनुमाने ६० ते ७० टक्के काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. वर्षअखेर हे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न रहाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

महामार्गाच्या कामाची हवाई पहाणी करतांना मंत्री नितीन गडकरी आणि खासदार रणजितसिंह नाईक

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे आहेत, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर एकूण १२ पालखी स्थळे आहेत. वारकर्‍यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी मार्गांवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदी सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

महामार्गाच्या कामाची हवाई पहाणी करतांना मंत्री नितीन गडकरी आणि खासदार रणजितसिंह नाईक

या वेळी गडकरी पुढे म्हणाले की,

१. देहू, आळंदी, पंढरपूर ही महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रे आहेत. हा भक्तीमार्ग उत्कृष्ट असावा. ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेले वृक्ष लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या मार्गांवरील दुपदरी रस्ते चौपदरी करत आहोत आणि वारकर्‍यांचे पाय भाजू नयेत, याची काळजी घेणार आहोत. यासह पुण्यातील चांदणी चौकातील मार्गाचे अपूर्ण काम येत्या एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल.

२. महामार्गाच्या कामासाठी लागणारे सिमेंट आणि पोलाद यांवरील वस्तू सेवा कर राज्यशासनाने माफ करावा, तसेच धरणांमधील वाळू काढून त्याचा वापर रस्ते बांधकामासाठी केला जावा, अशी विनंती करणार आहे.