म्हादईचे पाणी मलप्रभेत वळवल्याविना गप्प बसणार नाही ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
पणजी, १२ मार्च (वार्ता.) – म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीत वळवल्याविना गप्प बसणार नाही, असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. कर्नाटकमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गदग, कर्नाटक येथे आयोजित भाजपच्या एका प्रचारसभेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बोलत होते.
ते पुढे म्हणाले,
‘‘अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गोवा येथील एका सार्वजनिक सभेत ‘म्हादईचे एक थेंब पाणी कर्नाटकला देणार नाही’, असा दावा केला होता. यामुळे काँग्रेस पक्षाला शेतकर्यांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. म्हादईसाठी मी २६५ कि.मी. पदयात्रा काढली. त्यामुळे केंद्र सरकारने याची नोंद घेतली. केंद्रातील डॉ. मनमोहन सिंह सरकारने म्हादईचे पाणी कर्नाटकला देण्यास नकार दिला, तर केंद्रातील विद्यमान मोदी सरकारने म्हादईची वाट मोकळी केली आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
कर्नाटक सरकारच्या म्हादईवरील कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (‘डी.पी.आर्.’ला) केंद्रीय जल आयोगाने संमती दिली आहे, तर केवळ वन खात्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळणे बाकी आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर निविदा काढून कळसा-भंडुरा प्रकल्पांचे काम चालू केले जाणार आहे.’’