गोव्यात ३९ दिवसांमध्ये आगीच्या १ सहस्र ३०० दुर्घटना : ८व्या दिवशीही आगीच्या दुर्घटना चालूच !
पणजी, १२ मार्च (वार्ता.) – गोव्यात मागील अग्नीशमन केंद्राकडे ३९ दिवसांमध्ये आगीसंबंधी १ सहस्र ३०० दुर्घटनांच्या नोंदी झाल्या आहेत. अग्नीशमन केंद्राकडे या काळात एकूण १ सहस्र ६०० नोंदी झाल्या, ज्यात १ सहस्र ३०० आग दुर्घटनेच्या, तर इतर आपत्कालीन घटनांच्या आहेत. १ सहस्र ३०० पैकी २६८ घटना वनक्षेत्रातील आगीसंबंधी, ६४२ या शेतांमधील गवताला आग लागण्याविषयी, २०० हून अधिक घर किंवा दुकान यांना आग लागण्याच्या आहेत. १२ मार्च या दिवशी राज्यात सुर्ल आणि नेत्रावळी येथे प्रत्येकी २ ठिकाणी; शिगाव, तर कुर्डी आणि कोपर्डे येथे प्रत्येकी एक ठिकाणी मिळून एकूण ७ ठिकाणी लागलेली आग अजूनही सक्रीय आहे. या ठिकाणी आग विझवण्यासाठी अग्नीशमन दल, वन खाते, भारतीय वायू सेना, नौसेना आणि स्थानिक नागरिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
5. Copordiem Beat, Valpoi – Govt. forest
6. Shigao Beat – Govt. forest
7. Curdi Colomba beat- Govt. forest
8. Okambi Piliem beat – Govt. forest*ACTIVE FIRES DOUSED ON 12.3.2023 after 4PM*
One at Malpe-Pernem and other at Potrem-Curdi
— VishwajitRane (@visrane) March 12, 2023
वनमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्वीट करून माहिती दिली की, राज्यातील वनक्षेत्रांमध्ये अजून ७ ठिकाणी आग सक्रीय असून ती विझवण्यासाठी ४५० हून अधिक मनुष्यबळ नेमण्यात आले आहे.
धारबांदोडा येथे डोंगराला आग
धारबांदोडा येथे संजीवनी साखर कारखान्याच्या समोर असलेल्या डोंगराला १२ मार्च या दिवशी आग लागली. कुळे वन विभागाचे अधिकारी नारायण प्रभुदेसाई आणि अन्य २० कर्मचारी यांनी आग विझवण्यासाठी दिवसभर प्रयत्न केला.
म्हादई खोर्यात आग धुमसणे चालूच !
९ दिवसांपूर्वी सत्तरीच्या साट्रे परिसरात लागलेली आग, तसेच ७ डोंगरमाथ्यांवर लागलेली आग कायम आहे. वन खाते, वायूदल आणि नौदल यांच्या सैनिकांना १६ ठिकाणी आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाल्याचा दावा वन खात्याने केला आहे. कासरपाल येथून साळला जाणार्या मार्गात वडावल गावात शिवलिंग आहे. हे शिवलिंग असलेल्या डोंगरावर आग लागली आहे, तसेच टोक, पणजी येथील शेतातील गवताला, तसेच मठ-घोगळ-मडगाव येथील डोंगराला आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जिल्हाधिकार्यांनी राज्यात वाढलेले तापमान आणि अल्प झालेली आर्द्रता लक्षात घेऊन नागरिकांना काय करावे ? आणि काय करू नये ? यासंबंधी सार्वजनिक मार्गदर्शक सूचना ११ मार्च या दिवशी प्रसिद्ध केली आहे. ही सूचना आगीच्या दुर्घटना घडत असलेल्या गावांमधील सार्वजनिक वास्तूच्या ठिकाणी लावण्यात येत असून ग्रामस्थानांही पत्रक स्वरूपात ते वाटण्यात येत आहे.
कर्नाटकच्या जंगलात आग पसरू नये, यासाठी कर्नाटक सरकार सक्रीय
सत्तरी – कर्नाटकच्या सीमेच्या लगत गोव्यात सत्तरी तालुक्यातील वनक्षेत्रात आगीच्या दुर्घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. ही आग कर्नाटकच्या जंगलात पसरू नये, यासाठी कर्नाटक सरकार सक्रीय झाले आहे. कर्नाटकमधील बेळगाव वन विभागाच्या अधिकार्यांनी भीमगड वन्यजीव अभयारण्यात आणि गोव्याच्या सीमेलगत संभाव्य आग विझवण्यासाठी गट नेमणे, ग्रामस्थांमध्ये विशेषत: भीमगड अभयारण्यात रहाणार्या गवळी जमातीमध्ये जागृती करून त्यांचा आग विझवण्याच्या कार्यात सहभाग करून घेणे आदी उपाययोजना आखल्या आहेत. पश्चिम घाटात कर्नाटकच्या सीमेपासून २० कि.मी.अंतरावर गोव्यात आगीच्या दुर्घटना घडत आहेत.
वन खात्याच्या आवाहनाला काही घंट्यांतच शेकडो कार्यकर्त्यांचा प्रतिसाद
वन खात्याने सत्तरी येथील म्हादई वन्यजीव अभयारण्य आणि मोले येथील ‘मोले राष्ट्रीय उद्यान’ येथे ‘वनक्षेत्रांतील आग विझवण्यासाठी कार्यकर्ते पाहिजेत’, असे सामाजिक माध्यमातून ११ आणि १२ मार्च असे दोन दिवस आवाहन केले. या आवाहनाला काही घंट्यांतच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. आवाहन केल्यानंतर काही घंट्यांतच शेकडो कार्यकर्त्यांनी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली. कार्यकर्त्यांनी तांबडी सुर्ला, शिगाव आणि मोले येथे आग लागलेल्या ठिकाणी जाण्याची सिद्धता दर्शवली. सामाजिक कार्यकर्त्यांचा १० ते १५ जणांचा गट आळीपाळीने वनक्षेत्रांतील आगींवर देखरेख ठेवणार आहे आणि याचे व्यवस्थान उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातून इतर सर्व संबंधित खात्यांच्या समन्वयाने केले जात आहे. प्राप्त माहितीनुसार वनक्षेत्रांमध्ये ५ मार्चपासून आग लागल्याच्या घटना घडत असल्यापासून स्थानिक गावातील युवक अहोरात्र आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वन खात्याचे प्रधान मुख्य संरक्षक राजीव गुप्ता वन खात्यातील इतर वरिष्ठ अधिकार्यांसमवेत संभाव्य आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन क्षेत्रांमध्ये तळ ठोकून आहेत.