साधकांच्या अडचणी दूर करून त्यांच्या साधनेला गती देणारे आणि साधकांना आपलेसे करून त्यांना घडवणारे सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर !
विदर्भातील साधकांना पू. अशोक पात्रीकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सौ. सत्याली देव, चंद्रपूर
१ अ. जवळीक साधणे : ‘माझे यजमान साधना करत नाहीत. पू. पात्रीकरकाका आमच्याकडे आल्यावर माझे यजमान पू. काकांशी स्वतःहून बोलत नाहीत; पण पू. काका यजमानांशी त्यांच्या आवडीच्या विषयावर मनमोकळेपणाने बोलतात.
१ आ. स्वावलंबी आणि व्यवस्थितपणा : पू. काकांचे रहाणीमान अतिशय साधे आहे. ते स्वतःचे कपडे स्वतः धुतात. त्यांच्या खोलीतील साहित्य व्यवस्थित आवरलेले असते.
१ इ. जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती
१. पू. काकांना कुठलीही नवीन गोष्ट किंवा पदार्थ दिसला, तर ते त्याविषयी जाणून घेतात.
२. त्यांना साधकांकडून शिकायला मिळालेले सूत्रही ते लगेच लिहून घेतात.
१ ई. इतरांचा विचार करणे : पू. काकांच्या आवश्यकताही अल्प आहेत. ते परिस्थितीशी जुळवून घेतात. ते अनेक वेळा ‘साधकांना त्रास होऊ नये’, यासाठी दुपारच्या अल्पाहाराच्या वेळी स्वतःच्या जवळ असलेला खाऊ खातात.
१ उ. सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ : एकदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वरक्षण प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवायचे होते. आम्ही त्याचा सराव करत असतांना पू. पात्रीकरकाकांनी आम्हाला त्यातील काही बारकावे सांगितले आणि ‘त्वेषाने आवाज कसा काढायचा ?’, हे म्हणून दाखवले. तेव्हा मला पू. काकांच्या संदर्भात ‘मूर्ती लहान; पण कीर्ती महान’, हे वाक्य आठवले. (पू. पात्रीकरकाकांची उंची कमी आहे, तसेच शरीरयष्टीही बारीक आहे.)
१ ऊ. सूक्ष्मातील जाणणे : एकदा मला आध्यात्मिक त्रास होत होता. तेव्हा माझ्यातील नकारात्मक विचारांमुळे मी पू. काकांना भ्रमणभाष केला नाही. तेव्हा पू. काकांनी स्वतःहून मला भ्रमणभाष करून माझी विचारपूस केली.
१ ए. पू. पात्रीकरकाकांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. मला आध्यात्मिक त्रास होत असतांना मी पू. पात्रीकरकाकांना मानसरित्या त्रासाविषयी सांगितले, तरीही माझा त्रास न्यून होतो.
२. पू. काका मार्गदर्शन करत असतांना ‘त्यांच्या ठिकाणी प.पू. भक्तराज महाराज आहेत’, अशी अनुभूती मला अनेक वेळा आली आहे.
३. एकदा आमच्या घराच्या आवारातील एक मोठे झाड तोडण्यात पुष्कळ अडथळे येत होते. आम्ही आध्यात्मिक स्तरावर उपाय करूनही ते झाड पाडता येत नव्हते. ‘ते झाड आमच्या किंवा शेजारच्या घरावर पडेल’, अशी शक्यता निर्माण झाली. तेव्हा मी पू. काकांना भ्रमणभाष केला. मी त्यांच्याशी बोलत असतांनाच ते झाड पडले; पण कुठलीही हानी झाली नाही. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
२. श्री. हृषिकेश संजीव हरदास, वर्धा
२ अ. साधकांवर पितृवत प्रेम करून त्यांना घडवणे : ‘पू. काकांचे प्रत्येक साधकाकडे बारकाईने लक्ष असते. साधकांकडून चूक झाल्यास पू. काका त्यांना प्रेमाने चूक समजावून सांगतात. त्यामुळे साधकांना पू. काकांचा आधार वाटतो. पू. काका साधकांमधील गुण हेरतात आणि त्यांना क्षमतेनुसार सेवा देऊन साधनेच्या पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी प्रयत्नरत असतात. ‘पू. काकांच्या मनात युवा साधकांविषयी पितृवत प्रेम आहे’, असे मला जाणवते.
२ आ. पू. काकांकडे पाहिल्यावर ‘ते सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवते.
२ इ. अनुभूती – ‘पू. पात्रीकरकाकांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे दिसणे : मी पू. काकांकडे पाहिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्यासमोर उभे आहेत’, असे मला नेहमी जाणवते. त्याप्रमाणे मला अनुभूतीही येतात. ‘पू. काकांच्या वाणीतून चैतन्य प्रक्षेपित होत आहे आणि त्या चैतन्याने माझ्या शरिरातील काळी (त्रासदायक) शक्ती नष्ट होत आहे’, असे मला वाटते. विदर्भातील साधकांची प्रगती होण्यासाठी श्रीकृष्णाने आम्हाला पू. पात्रीकरकाकांचा सत्संग दिला आहे. त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत.’
३. सौ. स्मिता संजीव हरदास, वर्धा
३ अ. पू. पात्रीकरकाकांनी साधिकेला निराशेतून बाहेर पडायला साहाय्य करणे : ‘पू. पात्रीकरकाकांशी माझी पहिल्यांदा भेट झाली, तेव्हा मी पुष्कळ निराश होते. त्यांनी मला माझे विचार लिहून द्यायला सांगितले. मी माझ्या मनातील विचार लिहून दिल्यावर त्यांनी ते वाचले आणि मला दिलासा दिला. तेव्हापासून मी सकारात्मक राहू लागले. पू. काकांशी भेट झाल्यावर मला पुष्कळ आनंद मिळतो आणि चैतन्य अनुभवता येते. ‘साधक साधनेत पुढे कसे जातील ?’, याची त्यांना पुष्कळ तळमळ आहे. त्यांच्या सत्संगांमध्ये आम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
३ आ. पू. काकांमधील प्रीती पाहून मला परात्पर गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) आठवण येते. पू. काकांसमोर बसल्यावर ‘आम्ही परात्पर गुरुदेवांच्या चरणांशी बसलो आहोत’, असे मला वाटते.’
४. सौ. ललिता पाटील, बोरगाव, वर्धा
४ अ. आनंदी आणि प्रांजळ : ‘पू. काका पुष्कळ आनंदी असतात. ‘ते प्रांजळ आणि प्रामाणिक आहेत’, असे त्यांच्या बोलण्यातून जाणवते.
४ आ. साधकांना घडवणे : पू. काकांना ‘साधकांनी साधना करून प्रगती करून घ्यावी’, अशी पुष्कळ तळमळ आहे. ते साधकांच्या भल्यासाठी स्पष्टपणे बोलतात. तेव्हाही त्यांच्या बोलण्यात गोडवा आणि आपुलकी असते.
५. श्रीमती सुरेखा खानोरकर, वर्धा
५ अ. पू. पात्रीकरकाकांच्या सत्संगामुळे व्यष्टी साधनेचा आढावा देतांना वाटणारी भीती दूर होणे : ‘आम्हाला पू. पात्रीकरकाकांचे मार्गदर्शन मिळू लागल्यापासून माझ्या मनातील भीती आणि दडपण न्यून झाले. मला प्रथम व्यष्टी साधनेचा आढावा द्यायला भीती वाटायची. माझ्या मनात ‘माझी व्यष्टी साधना नीट होत नाही, तर आढावा कसा द्यायचा ?’, असा विचार असायचा; मात्र पू. काकांचा सत्संग ऐकल्यापासून माझी भीती दूर झाली. पू. काका सर्वांना भरभरून प्रेम देतात. ते सतत शिकवण्याच्या स्थितीत असतात. पू. पात्रीकरकाका यांच्याविषयी लिहितांना शब्द अपुरे पडतात.
५ आ. ‘पू. काका मार्गदर्शन करत असतांना प.पू. गुरुमाऊलीच बोलत आहे’, असे वाटते.’
६. सौ. माधुरी चिमूरकर, वर्धा
६ अ. पू. पात्रीकरकाकांनी प्रीतीने सर्वांना आपलेसे करून घेणे : ‘पू. पात्रीकरकाकांच्या बोलण्यात पुष्कळ माधुर्य आहे. ते नेहमी आनंदी असतात. ते प्रत्येक साधकाची आस्थेने विचारपूस करतात. ते प्रत्येक साधकाकडे जातात आणि त्यांच्या नातेवाइकांनाही आपलेसे करून घेतात. त्यांचे ‘प्रत्येक साधकाची प्रगती व्हावी’, या दृष्टीने प्रयत्न असतात. पू. काकांकडून मला ‘प्रामाणिकपणा, प्रेमभाव, नेतृत्वगुण आणि ‘पालकत्व कसे असावे ?’ इत्यादी अनेक गुण शिकायला मिळाले.’
७. सौ. वंदना पाटील, नालवाडी, वर्धा
७ अ. पू. पात्रीकरकाका घरी आल्यावर घरात चैतन्य जाणवणे : ‘एकदा पू. पात्रीकरकाका आमच्या घरी आले होते. तेव्हा आम्हाला घरातील वातावरणात हलकेपणा जाणवत होता. आम्हाला घरातील वातावरण चैतन्यमय वाटत होते. सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले होते. माझ्या सासूबाईंच्या (सौ. मालती पाटील यांच्या) डोळ्यांतही अश्रू आले. तेव्हापासून माझ्या सासूबाईंना अर्पण करण्याचे महत्त्व कळले. ‘साधूसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा ।’, असे म्हणतात, ते खरेच आहे.’
८. श्री. दीपक जमनारे, वर्धा
८ अ. साधकाला कार्यालयातील वरिष्ठांनी खोट्या प्रकरणात गुंतवणे, साधकाच्या मनावर पुष्कळ ताण येणे, त्याविषयी पू. पात्रीकरकाकांना सांगितल्यावर त्यांनी नामजपादी उपाय सांगणे आणि ते उपाय केल्यावर साधकाला त्या प्रसंगातून बाहेर पडता येणे : ‘मी साधनेत आल्यापासून माझा पू. पात्रीकरकाकांशी परिचय आहे. मला त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येते. काही मासांपूर्वी माझ्या कार्यालयातील विरष्ठ अधिकार्यांनी मला एका प्रकरणात विनाकारण गोवले होते. त्याचा मला प्रचंड ताण आला होता. दुसर्या दिवशी मी पू. पात्रीकरकाकांना भ्रमणभाष केला. त्यांचे प्रेमळ आश्वासक शब्द ऐकूनच मला आलेला ताण निघून गेला. मी त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. त्यावर त्यांनी मला काही स्थुलातील आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगितले अन् ‘काळजी करू नका’, असे म्हणाले. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती केली. त्यानंतर ५ – ६ दिवसांतच ते प्रकरण निवळले आणि मी त्या प्रसंगातून बाहेर पडलो. पू. काकांचे चैतन्य आणि संकल्प यांमुळेच हे शक्य झाले.
८ आ. परात्पर गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि पू. पात्रीकरकाका यांच्यामुळे साधकाच्या व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याच्या प्रयत्नांत वाढ होणे : माझ्या मनात ‘स्वेच्छानिवृत्ती घ्यावी कि नाही ?’ यांविषयी द्वंद होते. याविषयी मी पू. पात्रीकरकाकांशी बोललो. त्यांनी मला सांगितले, ‘‘पुढचा काळ पुष्कळ कठीण आहे. पुढे काही मिळेल कि नाही ?’, याची शाश्वती नाही. साधनेला वेळ द्या.’’ त्यामुळे माझ्या मनाचा निश्चय झाला आणि मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सध्याचा काळ पहाता ‘त्यांचे बोल सत्य ठरत आहेत’, हे लक्षात येत आहे. आता मला अधिकाधिक साधना करण्यासाठी वेळ मिळत आहे. परात्पर गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि पू. काका यांच्यामुळे माझे व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याचे प्रयत्न वाढले आहेत.’
९. श्री. नीरज क्षीरसागर आणि सौ. भार्गवी नीरज क्षीरसागर, वर्धा
९ अ. साधकांना नामजपादी उपाय सांगून साहाय्य करणे
१. ‘आमचा मुलगा (श्रीरंग, वय ८ वर्षे) लहान असतांना एकदा रात्री त्याचा कान दुखत होता. पू. काकांना उपाय विचारल्यावर त्यांनी लगेच नामजपादी उपाय सांगितले. त्यांनी दुसर्या दिवशी सकाळी श्रीरंगची विचारपूसही केली.
२. एकदा श्रीरंगची प्रकृती पुष्कळ बिघडली होती. तेव्हाही पू. काकांनी लगेच मंत्रजप दिले. त्यानंतर त्याची प्रकृती बरी झाली. एकदा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सौ. शालिनी मराठेकाकूंचा (आताच्या पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांचा) पू. पात्रीकरकाकांविषयी ‘अश्विनीकुमार’ असा उल्लेख असलेला लेख प्रकाशित झाला होता. त्याची अनुभूती आम्ही विविध प्रसंगांमध्ये घेतली आहे.
९ आ. पू. काकांचे वय अधिक असूनही ते सतत सेवारत असतात. त्यांचे साधकांच्या साधनेकडे सतत लक्ष असते.’
१०. श्री. शशिकांत पाध्ये, वर्धा
१० अ. स्वभावदोष सत्संगात साधकांना मूळ स्वभावदोष शोधण्यास साहाय्य करणे, साधकांशी सहजतेने बोलून त्यांच्या मनावर आलेला ताण दूर करणे : ‘वर्ष २००३ मध्ये माझा पू. पात्रीकरकाकांशी परिचय झाला. तेव्हा मी अमरावती सेवाकेंद्रात सेवेला होतो. पू. काका नेहमी मनमोकळेपणाने बोलायचे. ते साधकांचा सत्संग घ्यायचे. तेव्हा ते साधकांना त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या मुळाशी न्यायचे. ते साधकांना बोलते करण्यासाठी अनेक प्रयत्न करायचे. त्यांच्या बोलण्यात सहजता असल्यामुळे मला त्यांच्याशी बोलतांना ताण येत नाही. साधकांना ताण आला असल्यास पू. काका सहजतेने त्यांच्या मनावरील ताण हलका करतात. त्यामुळे साधक पू. काकांना मनातील सर्व मनमोकळेपणाने सांगतात आणि अडचणींवर उपाय विचारतात. माझ्यात शिकण्याची वृत्ती अल्प असल्याने मी त्यांनी सांगितलेली सूत्रे आत्मसात करण्यात पुष्कळ न्यून पडलो.
१० आ. साधकांना आधार देणे : वर्ष २०१८ मध्ये मला कर्करोग झाल्याचे निदान झाले. माझे शस्त्रकर्म करावे लागले. तेव्हा पू. काकांनी मला मंत्रोपचार सांगितले. तेव्हा ‘पू. काका केवळ संत नसून देवांचे वैद्य ‘अश्विनीकुमार’च आहेत’, असे वाटून माझी भावजागृती झाली. ते सेवेत कितीही व्यस्त असले, तरीही ते साधकांच्या अडचणी सोडवण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे साधकांना त्यांचा पित्यासम आधार वाटतो. साधकांना त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो.
१० इ. पू. पात्रीकरकाकांनी ‘गुरुकृपा आहे; म्हणूनच तुम्ही साधनेत टिकून आहात’, असे सांगणे : माझे वडील प्रख्यात ज्योतिषी होते. एकदा मी वडिलांना विचारले, ‘‘मला गुरुप्राप्ती होईल का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तशी शक्यता जवळजवळ नाहीच; परंतु गुरुकृपा झाली, तर तुझी प्रगती होऊ शकते.’’ हा प्रसंग मी पू. काकांना सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्हाला श्री गुरूंचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते’, ही गुरुकृपाच आहे. तुमच्यावर गुरुकृपा नसती, तर तुम्ही साधनेत स्थिर राहू शकला नसता.’’
१० ई. पू. पात्रीकरकाकांनी छत्तीसगडमधील एका धर्मशिक्षणवर्गात मार्गदर्शन केले. तेव्हा उपस्थित धर्मप्रेमींचा भाव वाढण्यास साहाय्य झाले.
११. सौ. रजनी थोटे, वर्धा
११ अ. ‘प्रत्येक साधकाची साधना व्हावी’, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे पू. पात्रीकरकाका ! : ‘पू. पात्रीकरकाका ‘प्रत्येक साधकातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन व्हावे’, यासाठी तळमळीने प्रयत्न करतात. साधकांत ‘स्वीकारण्याची, शिकण्याची आणि ऐकून घेण्याची वृत्ती निर्माण व्हावी’, यांसाठी पू. काका साधकांना प्रयत्न करायला सांगतात. पू. काका प्रत्येक साधकाच्या मनावर ‘आपल्याला महान गुरु लाभले आहेत, तर आपण साधना करून जीवनाचे सार्थक करायला पाहिजे’, असे बिंबवतात.’
(क्रमशः)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (२८.६.२०२१)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/662484.html
|