मंदिरे पर्यटनस्थळे नाहीत !
सध्या धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली देशात एक चुकीचा संदेश रुजवला जात आहे. यामध्ये अनेक जण सुट्टीत मौजमजा करण्यासाठी तीर्थक्षेत्री किंवा मंदिरात जातात; तेथे त्यांना धर्माशी किंवा ईश्वरावरील भावाविषयी विशेष काही देणे-घेणे नसते. पुष्कळशा मंदिरांची व्यावसायिक दृष्टीकोनातून पर्यटनस्थळ म्हणून निरनिराळ्या दर्जात विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्या पवित्र परिसरात हौशे-गौशांचेच प्रमाण वाढत आहे, तसेच भ्रमणभाषचे आवाज, चित्रीकरण करणे, स्वतःची वेगवेगळ्या हावभावात छायाचित्रे काढणे अशा कृतींमुळे तेथील पावित्र्य नष्ट होत आहे. तीर्थक्षेत्री जाणार्यांच्या मनात कदाचित् असेही असेल की, अन्य ठिकाणी जाण्याऐवजी आपण तीर्थक्षेत्री गेलो, तर आपल्याला थोडातरी लाभ होईल. हे योग्यही आहे; परंतु तेथे गेल्यानंतर आपले आचरण कसे असायला हवे ? याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
‘पर्यटनस्थळ’ हा शब्दच मुळात भौतिक सुखाशी निगडित आहे. अनेक भाविक मनात पवित्र हेतू ठेवून वा स्वतःची साधना म्हणून श्री नर्मदादेवीची परिक्रमा किंवा अन्य यात्रा करतात. पायी परिक्रमा करू न शकणार्यांसाठी वाहनाने परिक्रमा करण्याची सुविधा आता उपलब्ध आहे. त्याचा भावपूर्ण लाभ अवश्य घ्यावा; परंतु मध्यंतरी असे वृत्त वाचनात आले की, काही लोक निव्वळ मौजेसाठी सहल (प्लेझर ट्रिप) म्हणून परिक्रमा करतात. अशांच्या मनात ईश्वरावर श्रद्धा असतेच असे नाही. त्यामुळे त्यांच्या वर्तनातून कळत नकळत इतर भाविकांच्या साधनेत व्यत्यय येत आहे, याचे त्यांना भानही नसते. नर्मदा परिक्रमा किंवा कोणतीही यात्रा विरंगुळा या उद्देशाने करायला नको. स्थान माहात्म्य म्हणून तीर्थयात्रा किंवा देवदर्शनाला गेलो, तर भगवंताच्या सान्निध्याचा आनंद अधिकाधिक प्राप्त करता येऊ शकतो.
प्रत्येक भाविकाने तीर्थस्थळ किंवा देवालय हे निव्वळ पर्यटनस्थळ नसून आपले ऊर्जा स्थान आहे, हे लक्षात घ्यावे, तसेच देवस्थानांनी देवदर्शनाला येणार्या भाविकांकरता केलेल्या सुविधांचा तेथील नियमांप्रमाणे आचरण करून लाभ घेऊन तेथील पावित्र्य अबाधित राखावे. त्यामुळे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि तीर्थक्षेत्रांच्या सात्त्विकतेचा, तसेच तेथील देवदर्शनाचा आनंदही अनुभवता येईल. सरकारने यातून बोध घेऊन मंदिरांचे सरकारीकरण थांबवावे, जनतेला धर्मशिक्षण देऊन तीर्थक्षेत्रांचे महत्त्व लक्षात आणून द्यावे, हीच अपेक्षा !
– श्री. श्रीकांत पाध्ये, नागपूर