गुन्हा झाला; पण शिक्षा नाही ! असे कसे ?
भारतीय दंड विधान १८६० (आयपीसी १८६०), हे असे कायद्याचे पुस्तक आहे की, ज्यामध्ये सर्व फौजदारी गुन्हे, त्यांचे तपशील, अटी आणि शर्ती, शिक्षा यांचे वर्णन केलेले असते. एखाद्या व्यक्तीच्या हातून दुसर्या व्यक्तीला दुखापत अथवा गंभीर दुखापत किंवा मरण आले, तर त्याला मनुष्यहानी किंवा वधासाठी कारावासाची शिक्षा किंवा शिक्षेसह दंड ठोठावला जातो.
न्यायशास्त्रानुसार आपल्याकडे असा मानक (प्रमाण) आहे की, ११ गुन्हेगार सुटले तरी चालतील; पण एका निरापराध्याला शिक्षा होता कामा नये. या तत्त्वानुसार भारतीय कायदा काम करतो. गुन्ह्याचा आरोप ज्याच्यावर केला जातो, त्याचा गुन्हा सरकारी पक्षाला ‘बियाँड द डाऊट’ (संशयाच्या पलिकडे) सिद्ध करावा लागतो; परंतु असे काही गुन्हे आहेत की, जे गुन्हे या व्याख्येमध्ये येत नाहीत. असे जर फिर्यादीला सिद्ध करायचे असल्यास फिर्यादीला तो कसा निर्दोष आहे, हे सिद्ध करता येते. आयपीसी १८६० नुसार यांना ‘सामान्य अपवादा’च्या (जनरल एक्सेप्शनस्) नावाखाली मुभा मिळते आणि यांच्यावर कारवाई होत नाही.
भारतीय दंड विधानानुसार ‘मिस्टेक ऑफ फॅक्ट’ (वस्तूस्थितीविषयक चूक), ‘ज्युडिशिअल ॲक्ट’ (न्यायिक कायदा), ‘ॲक्सिडेंट’ (अपघात), ‘ॲब्सेन्स ऑफ क्रिमिनल इंटेन्शन’ (गुन्हेगारीदृष्ट्या अनुपस्थिती), ‘ॲक्ट डन बाय कन्सेंट’ (संमतीने केलेले कार्य), ‘ट्रॅफिलिंग ॲक्ट’ (तस्करी कायदा) आणि ‘राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स’ (खासगी संरक्षणाचा अधिकार) यांनुसार होणारी कृत्ये ‘सामान्य अपवादा’मध्ये येतात.
कोणत्या घटनांमध्ये गुन्हा नोंद होऊ शकत नाही ?
१. एखाद्या सैनिकाने त्याच्या वरिष्ठांच्या कायदेशीर आदेशानुसार एखाद्या समूहातील लोकांवर बंदुकीच्या गोळ्या चालवल्या, तर त्याचा हा गुन्हा होत नाही.
२. उदाहरणार्थ समजा ‘क्ष’ नावाच्या न्यायालयाच्या अधिकार्याने न्यायालयाच्या आज्ञेप्रमाणे ‘ब’ नावाच्या माणसाला पकडून आणले. पूर्ण कारवाईनंतर असे उघकीस आले की, मुळात ‘ब’च्या ऐवजी ‘र’ ला पकडायचे होते आणि ‘ब’ला पकडणे, ही चूक होती, तर अशा कृत्याला शिक्षा होत नाही. असे कृत्य कायदेशीर असते; परंतु वस्तूस्थितीमध्ये त्रुटी असतात. अशा कृत्यांना शिक्षा नाही.
३. तांत्रिक त्रुटीनुसार जर न्यायाधीश आणि दंडाधिकारी यांनी एखाद्यास शिक्षा सुनावली असेल अन् तो निर्णय न्यायदानाच्या दृष्टीकोनातून योग्य झालेला असेल, तर त्या गुन्ह्याविषयी न्यायाधीश, तसेच इतर अधिकारी यांना शिक्षा होत नाही.
४. समजा क्रिकेट खेळत असतांना खेळाडूला जर चेंडू अपघाताने लागला आणि त्या खेळाडूला गंभीर दुखापत झाली अथवा तो मरण पावला, तर संबंधितांवर गुन्हा नोंद होत नाही.
५. एखाद्याचा अपघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आणि तो अपघात करणार्याची तशी काहीही इच्छा नसेल, तर तो गुन्हा घडत नाही.
६. चांगल्या हेतूने अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी दुसर्याचा जीव अथवा मालमत्ता वाचवण्याचा प्रयत्न करत असतांना गुन्हा घडला, तर तो गुन्हा धरला जात नाही.
७. सात वर्षांच्या आतील मुला-मुलींकडून गुन्हा घडला, तर तो गुन्हा नाही. तसेच ७ ते १२ वर्षांच्या आतील अविकसित मुलांकडून गुन्हा घडल्यास तो सामान्य अपवादानुसार गुन्हा होत नाही.
८. वेडसर माणसाकडून घडलेला गुन्हा हा गुन्हा होत नाही.
९. एखाद्याला समजा वाघ पकडून घेऊन जात असतांना जर त्याला वाचवण्यासाठी एखाद्याने वाघावर गोळीबार केला; परंतु त्यात दुर्दैवाने माणसाचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीमध्ये दुसर्याला सद्हेतूने साहाय्य करण्यासाठी केलेले कृत्य गुन्हा या सदरात मोडत नाही.
१०. एखाद्या स्त्रीवर जर कुणी अतीप्रसंग करत असेल आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठी तिने स्वतःला वाचवण्यासाठी त्या व्यक्तीच्या डोक्यात जोराचा प्रहार केला अन् त्यात तो मेला, तर ‘राईट टू प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी’ (शरिराच्या खासगी संरक्षणाचा अधिकार) या सदराखाली हा गुन्हा होऊ शकत नाही.
महत्त्वाचे म्हणजे वर नमूद केलेली सूत्रे अर्थातच न्यायालयामध्ये सिद्ध व्हावी लागतात. त्यानंतरच ते गुन्हे आहेत कि नाहीत ? हे सिद्ध होते.
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.