हिंदु म्हणून एकत्र या अन् भगव्याची ताकद जगाला दाखवा !
कसबा (तालुका संगमेश्वर) येथील धर्मरक्षणदिन कार्यक्रमात माजी खासदार नीलेश राणे यांचे प्रतिपादन
रत्नागिरी – ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी वयाच्या ३२ व्या वर्षी हिंदु धर्मासाठी स्वत:च्या प्राणांचे बलीदान दिले, त्यांचा आदर्श समोर ठेवा. धर्म अडचणीत आहे. त्यामुळे आता तरी हिंदु म्हणून एकत्र या आणि भगव्याची ताकद जगाला दाखवा, असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी केले. संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समिती’च्या वतीने झालेल्या ‘धर्मरक्षण दिना’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
हिंदू म्हणून एकत्र या, भगव्याची ताकद अवघ्या जगाला दाखवा : निलेश राणे https://t.co/3id5jJ3Jny
— prahaar digital (@PrahaarD) March 12, 2023
नीलेश राणे पुढे म्हणाले,
१. छत्रपती शिवाजी महाराजांचा महापराक्रमी पुत्र असूनही केवळ समाज गाफील राहिला; म्हणून संभाजी महाराज शत्रूच्या हाती फंदफितुरीने सापडले. त्यांनी अनन्वित हाल सोसले, प्राणांचीही आहुती दिली; परंतु स्वत:चा धर्म सोडला नाही.
२. आपण शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी आहोत. आपण जिवंत असेपर्यंत त्यांचे देणे लागतो.
३. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कस जगावे ? हे शिकवले, तर छत्रपती संभाजी महाराजांनी कसे मरावे ? हे शिकवले. हेच राजे आपले आदर्श आहेत.
४. ‘धर्मवीर संभाजी महाराजांचा बलीदानदिन हा केवळ धर्मरक्षण दिवस उपक्रम आहे’, असे समजून त्यांना विसरू नका. आपण संघटित होणे आवश्यक आहे.
५. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी १० कोटी रुपये संमत केले, त्याविषयी त्यांचे आभार; मात्र याच जागेत महाराजांचे भव्य स्मारक झाले पाहिजे. त्यांच्या धर्मरक्षणाच्या त्यागाची आठवण पुढच्या पिढीनेही ठेवली पाहिजे, यासाठी शासनाने ५०० कोटी रुपये या स्मारकाला घोषित करावेत.