ब्रिटन सरकारच्या धोरणांवर टीका करणार्‍या वृत्त निवेदकाची बीबीसीकडून उचलबांगडी !

  • ब्रिटन सरकारच्या स्थलांतरित धोरणाविषयी केली होती टीका !

  • भारताच्या क्रीडामंत्र्यांकडून बीबीसीवर खरमरीत टीका !

बीबीसीचे मुख्य क्रीडा निवेदक गॅरी लिनेकर

लंडन – बीबीसीचे मुख्य क्रीडा निवेदक गॅरी लिनेकर यांनी ब्रिटन सरकारच्या प्रवासी धोरणावर टीका केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. यामुळे बीबीसीचा कर्मचारी वर्ग अप्रसन्न असून त्यांनी काम करण्यास नकार दिला आहे. यामुळे बीबीसीला ११ मार्च या दिवशी प्रसारित होणारा विशेष कार्यक्रम रहित करावा लागला.

१. लिनेकर हे ब्रिटन फुटबॉल संघाचे माजी कर्णधार आहेत. बीबीसीकडून आयोजित करण्यात येणार्‍य फुटबॉलविषयक कार्यक्रमात लिनेकर हे सर्वाधिक मानधन घेणारे मुख्य निवेदक आहेत. आठवड्याच्या आरंभी त्यांनी सरकारने सादर केलेल्या ब्रिटनच्या स्थलांतर धोरणावर टीका केली होती. त्यासाठी त्यांना निलंबित करण्यात आले.

२. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी निवेदन सादर करून सरकारच्या स्थलांतरितांच्या संदर्भातील धोरणांचा बचाव केला. सुनक यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत स्थलांतराविषयी विधेयक सादर करणार असल्याचे सांगितले आहे. ब्रिटनमध्ये आश्रय घेण्यासाठी अनेक शरणार्थी नौकेद्वारे जीव धोक्यात टाकून ब्रिटीश खाडी ओलांडून येतात. अवैधपणे येणार्‍या या लोकांवर सरकार निर्बंध घालण्याच्या सिद्धतेत आहे.

३. सुनक यांनी ‘लिनेकर आणि बीबीसी यांच्यातील मतभेद सोडवले जातील’, अशी आशा व्यक्त केली.

भारताच्या क्रीडामंत्र्यांकडून बीबीसीवर टीका !

बीबीसीच्या अन्याय्य कृतीवर टीका करतांना भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘वृत्तपत्रस्वातंत्र्य आणि वस्तूनिष्ठता यांविषयी मोठमोठे दावे करणारी बीबीसी तिच्या एका मुख्य वृत्तनिवेदकाला त्याने सामाजिक माध्यमांद्वारे केलेल्या वक्तव्यांवरून निलंबित करते, हे अयोग्य आहे. दुष्प्रचार करणार्‍यांकडून नैतिकतेच्या आधारावर वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी खंबीरपणे उभे रहाण्याची अपेक्षा करणेच चुकीचे आहे.’’

संपादकीय भूमिका 

  • गुजरात दंगलींविषयी खोटी माहिती प्रसारित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कलंकित केल्यावर वृत्तपत्र स्वातंत्र्यांची आवई उठवणार्‍या बीबीसीचे खरे स्वरूप जाणा !
  • स्वतः मात्र अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गप्पा मारणारी बीबीसी स्वतःच्या वृत्तनिवेदकाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची मात्र गळचेपी करते !