महाराष्ट्रातील गरीब मुलींची विवाहासाठी गुजरात आणि राजस्थान राज्यांत १ ते २ लाख रुपयांत होते विक्री !
विधान परिषद प्रश्नोत्तरे
मुंबई – महाराष्ट्रातील गरीब आणि अल्पवयीन मुलींची राजस्थान आणि गुजरात राज्यांत विवाहासाठी १ते २ लाख रुपयांत विक्री होत आहे. या संदर्भात या वर्षी २४ गुन्हे नोंद झाले आहेत. राज्यातून गरिब आणि अल्पवयीन मुलींची राजस्थान अन् गुजरात राज्यांच्या काही गावांमध्ये विवाहासाठी १-२ लाख रुपयांमध्ये व्यवहार केला जातो, हे अंशतः खरे आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. रासप पक्षाचे आमदार महादेव जानकर यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता.
Fadnavis: Girls from poor families sold for marriage in Rajasthan and Gujarat – The Indian Express https://t.co/LuiFzo4GdP
— Rajasthan Travel New (@Rajasthan_News) March 11, 2023
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, वर्ष २०२१ मध्ये महिलांचे विवाहासाठी अपहरण केल्याप्रकरणी ४०५ गुन्हे नोंद झाले होते. विवाहासाठी ४१८ महिलांचे अपहरण झाले होते. त्यामध्ये ३६३ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे, तर या गुन्ह्यांमध्ये ४४८ आरोपींना अटक झाली होती. वर्ष २०२३ मध्ये राज्यात विवाहासाठी अपहरण करण्यात आल्याप्रकरणी २४ गुन्हे नोंद केले आहेत.
मुंबई येथे २३३ अल्पवयीन मुली बेपत्ता !
मुंबई येथून वर्ष २०२२ मध्ये १ सहस्र ३३० अल्पवयीन मुली बेपत्ता होत्या. त्यांपैकी १ सहस्र ९७ मुली सापडल्या आहेत. १८ वर्षांवरील ४ सहस्र ४३७ महिला हरवल्याची नोंद वर्ष २०२२ मध्ये झाली होती. त्यांपैकी ३ सहस्र ३९ महिला सापडल्या आहेत, असे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले. हरवलेली मुले आणि मुली शोधण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन रियुनाइट’ राबवण्यात येत आहे.