व्यापारी, नागरिक यांना विश्वासात घेऊनच श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास करू ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ
कोल्हापूर – श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील विकासकामांचे नियोजन करतांना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करावा. स्थानिक नागरिक आणि व्यापारी यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊन कामांचे नियोजन करा, अशा सूचना यापूर्वीच प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास साध्य करू, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ‘महाद्वार रोड व्यापारी आणि रहिवासी असोसिएशन’च्या सभासदांना दिले. संघटनेच्या वतीने राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. त्या प्रसंगी राजेश क्षीरसागर यांनी हे आश्वासन दिले.
या वेळी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, संघटनेचे अध्यक्ष शामराव जोशी, ‘चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष संजय शेट्ये, सचिव डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, संचालक राहुल नष्टे, राकेश माने, सागर कदम, दिलीप धर्माधिकारी यांसह अन्य उपस्थित होते.