पुणे येथे आरोपीकडून ५० सहस्र रुपये घेणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित !
पुणे – एका गुन्ह्यातील आरोपीकडून ५० सहस्र रुपये घेणार्या अलंकार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी दिले आहेत. अरविंद शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अरविंद शिंदे हे डहाणूकर कॉलनी पोलीस चौकीत नियुक्तीस आहेत. या प्रकरणात तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर वरिष्ठ अधिकार्यांनी शिंदे यांची चौकशी केली. चौकशीत तथ्य आढळल्याने शिंदे यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस हे पोलीस विभागाला कलंकच आहे. अशा लाचखोरांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फ करून आतापर्यंत लुबाडलेली सर्व संपत्ती वसूल करून घ्यायला हवी ! – संपादक)