सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करणारे अग्निहोत्र !
आज १२ मार्च २०२३ या दिवशी ‘विश्व अग्निहोत्र दिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘यज्ञामुळे वायूमंडलाचे प्रदूषण होते’, असे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना वाटते ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. वेदांमध्ये मनुष्याला प्रतिदिन करायला सांगितलेले पंच-महायज्ञ !
‘सर्व प्राणीमात्रांच्या जीवनाचे कल्याण करणे आणि सृष्टी सुरक्षित ठेवणे यांसाठी वेदमंत्रांमध्ये प्रत्येक मनुष्याला प्रतिदिन ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, अतिथीयज्ञ आणि बलिवैश्वदेवयज्ञ हे ५ महायज्ञ करायला सांगितले आहेत.
२. निसर्गातील प्रदूषणकारी पदार्थांचे उच्चाटन करण्याचा एक उत्तम मार्ग !
जोपर्यंत मनुष्य प्रतिदिन वेदाद्वारे सांगितलेले पंच-महायज्ञ करत आपले जीवन व्यतीत करत होता, तोपर्यंत तो त्रिविध तापांपासून (आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक) दूर राहिला होता. कालांतराने मनुष्य हे महायज्ञ प्रतिदिन करेनासा झाला. परिणामस्वरूप मनुष्यजीवन नाना प्रकारचे नैसर्गिक प्रकोप आणि व्याधी यांनी दुःखदायक झाले. वास्तविक भगवंताने वेदांद्वारे सांगितलेला महायज्ञांचा नियम मनुष्यासहित संपूर्ण प्राणीमात्र आणि वनस्पती यांच्या हितासाठीच आहे. तसेच मानवाच्या अयोग्य कृतींमुळे निसर्गात पसरलेल्या प्रदूषणकारी पदार्थांचे उच्चाटन करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे; म्हणून मनुष्य हे यज्ञ करून केवळ स्वतःचेच कल्याण करत नाही, तर सर्व प्राणीमात्रांचे कल्याण साधत असतो.
३. पंचमहाभूतांच्या प्रदूषण निर्मूलनासाठी अग्निहोत्र हा उत्तम उपाय !
पंचमहायज्ञांपैकी एक देवयज्ञ आहे. देवयज्ञाद्वारे मूलतः चैतन्यमयी असलेल्या समस्त देवतांना तर्पण केले जाते, म्हणजे त्यांना संतुष्ट केले जाते. मानवासह संपूर्ण प्राणीमात्र आणि वनस्पती यांची निर्मिती पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या संयोगाने झाली आहे. मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत मानवाची विनाशकारी जीवनपद्धत आणि अयोग्य कृती यांमुळे पंचमहाभूतांचे प्रदूषण निश्चितपणे होते. वेदस्वरूप भगवंताने या प्रदूषणाचे निर्मूलन करण्यासाठी अग्निहोत्रासारखा उत्तम उपाय सांगितला आहे. अग्निहोत्र विचारपूर्वक, विधीपूर्वक आणि श्रद्धापूर्वक मंत्रपठण यांद्वारे करण्यात येणारे एक कर्मकांड आहे. ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे.
४. अग्निहोत्रामुळे मनुष्याच्या ५ कोषांची शुद्धी !
यज्ञाचा मूळ गाभा श्रद्धा आहे. श्रद्धेने अग्निहोत्र केल्यामुळे योग, आत्मा, परमात्मा आणि सृष्टी यांचे ज्ञान होते. मनुष्याचे शरीर हे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या ५ कोषांनी बनले आहे. अग्निहोत्र केल्यामुळे या ५ कोषांची शुद्धी होते.
५. अग्निहोत्र करण्यात परमार्थाची भावना सामावलेली असते. त्यामुळे कर्त्याला आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापांपासून शांती लाभते.
६. आपल्याकडून अग्निहोत्र करतांना श्रद्धापूर्वक वेदमंत्रांचे मधुर स्वरात उच्चार करून अग्निदेवाला आहुती दिली जाते. त्यामुळे पंचमहाभूतरूपी मूळ देवता आणि ऋषी यांच्या ऋणातून उतराई होता येते.
७. अग्निहोत्रामुळे होणारे विज्ञानाला कळलेले लाभ !
प्रत्यक्षात अग्नीमध्ये घातलेले तूप आणि हवन सामुग्री यांचे सूक्ष्म परमाणूंमध्ये विभाजन होऊन ते वायूमंडल शुद्ध करतात. आधुनिक पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी अग्निहोत्रावर संशोधन करून अग्निहोत्र वायूशुद्धीसाठी सर्वाेत्तम असल्याचे सिद्ध केले आहे. या संशोधनात असे सांगितले आहे की, हवेत आरोग्याला हानीकारक असणारे विषाणू आणि जीवाणू हे अग्निहोत्राच्या धुरामुळे नष्ट होतात. हवन सामुग्री जाळल्यामुळे निर्माण झालेला वायू (गॅस) वायूमंडलातील ढगांमध्ये मिसळला जाऊन पावसाच्या रूपात शुद्ध जलाचा वर्षाव होतो. अग्निहोत्राच्या राखेमुळे गंभीर त्वचा रोग बरा होतो. ही राख जलशोधकही आहे. वृक्ष-वनस्पतींच्या मुळांशी ही राख घातल्यामुळे मनुष्याला मधुर रसाळ फळे मिळतात. पाश्चात्त्य देशांमध्ये अग्निहोत्रामुळे प्रभावित झालेले लोक यज्ञ उपचार पद्धतीने (थेरपी) रोगांवर उपचार करत आहेत.
८. ऋषींनी सांगितलेला सामूहिक अग्निहोत्राचा नियम पाळणे आवश्यक !
आमच्या ऋषींनी प्रतिदिन अग्निहोत्र करण्यासह समाजाच्या संरक्षणासाठी सामूहिक अग्निहोत्राचाही नियम सांगितला आहे. दीपावली आणि होळी यांसारख्या मंगलमयी काळात ऋतुमानात पालट होत असतांना रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते; म्हणून या शुभकाळात सामूहिक रूपाने भव्यरूपात अग्निहोत्राचे आयोजन केले जात होते. अज्ञानामुळे आज आपण आपला हा अमूल्य वारसा विसरून गेलो आहोत. आज आपल्याला याची पुनर्प्रतिष्ठापना करण्याची आवश्यकता आहे.’
– नवीनकुमार सहसंपादक (साभार : ‘गीता स्वाध्याय’, मार्च २०२०)