सोलापूर येथे विश्वशांतीसाठी ‘श्रीयंत्र कोटी कुंकूमार्चन’ उत्सव !
सोलापूर – श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टच्या वतीने श्रो.ब्र.श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या संकल्पनेतून १७ ते १९ मार्च या कालावधीत विश्वशांतीसाठी ‘श्रीयंत्र कोटी कुंकूमार्चन’ उत्सव आणि मठाचा लोगो अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मठाधिपती श्री शिवपुत्र महास्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मठ यंदा ५० व्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने श्री बसवारूढ मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम सोलापूर येथे प्रथमच होत आहे. मुंबई येथील संन्यास आश्रमाचे प.पू. आचार्य महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संपूर्ण उत्सव करण्यात येणार आहे.
कुंकूमार्चन कार्यक्रमात सहभागी होणार्या सर्व महिलांना मठाचे संस्थापक सद्गुरु श्रो.ब्र.श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेले श्रीयंत्र देण्यात येणार आहे. ‘श्रीयंत्र कोटी कुंकूमार्चन’ उत्सवात कुंकूमार्चनासाठी अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मठाधिपती सद्गुरु श्री शिवपुत्र महास्वामीजी यांनी केले आहे.
१ सहस्राहून अधिक महिला सहभागी होणार !‘श्रीयंत्र कोटी कुंकूमार्चन’ उत्सवासाठी १ सहस्र ५०० श्रीयंत्र मागवण्यात आले असून करमाळा येथील केम येथून २ क्विंटल कुंकू घेण्यात आले आहे. ‘श्रीयंत्र कोटी कुंकूमार्चन’ कार्यक्रमात १ सहस्राहून अधिक महिला सहभागी होणार आहेत. |