अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत : गुंतवणूकदार चिंतेत
कॅलिफॉर्निया (अमेरिका) – अमेरिकेतील अग्रेसर असलेली सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाल्याने कॅलिफॉर्नियाच्या बँकिंग नियामकांनी बँकेला टाळे ठोकले आहे. यामुळे अमेरिकेसह जगभरातील लाखो गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. यासह बँकेची एकूण २०९ अब्ज डॉलर्सची मालमत्ता (१७ सहस्र १३० कोटी रुपयांहून अधिक), तसेच एकूण १७५.४ अब्ज डॉलर्सच्या (१४ सहस्र ३४३ कोटी रुपयांहून अधिक) ठेवीही जप्त करण्यात आली आहे. वर्ष २००८ मधील आर्थिक मंदीनंतर सिलिकॉन व्हॅली ही अमेरिकेतील बुडालेली सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक आहे.
Financial regulators have closed Silicon Valley Bank and taken control of its deposits, in what is the largest U.S. bank failure since the global financial crisis more than a decade ago. https://t.co/KHQOJ95IzW pic.twitter.com/oMjvAHbPLb
— CNBC (@CNBC) March 10, 2023
कॅलिफॉर्नियाच्या बँकिंग नियामकांनी १० मार्च २०२३ ला सिलिकॉन व्हॅली बँक बँक बंद केली आणि या बँकेच्या मालमत्तेच्या विल्हेवाटीसाठी ‘फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ (एफ्.डी.आय.सी.) या संस्थेची ‘रिसीव्हर’ म्हणून नियुक्ती केली. ‘सिलिकॉन व्हॅली बँकेचे मुख्य कार्यालय, तसेच सर्व शाखा या १३ मार्चला पुन्हा उघडल्या जातील आणि सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवींसंदर्भात निर्णय घेण्याची मुभा असेल’, असे ‘एफ्.डी.आय.सी.’ने स्पष्ट केले आहे. त्यानंतर मात्र बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध घातले जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे.
सिलिकॉन बँकेची स्थापना वर्ष १९८३ मध्ये बिल बिगरस्टफ आणि रॉबर्ट मेडेरिस यांनी कॅलिफॉर्निया येथे केली. ग्रेगरी डब्ल्यू. बेकर हे वर्ष २०११ पासून बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. वाढत्या व्याजदरामुळे बँकेच्या ताळेबंदावर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर बँकेने तिच्या समभाग (शेअर्स) विक्रीचा प्रस्ताव दिला. त्यामुळे तिचे शेअर्स ६२ टक्क्यांपेक्षा अधिक घसरले.
भारतावरही होणार परिणाम !
प्रामुख्याने तंत्रज्ञान आणि स्टार्ट-अप क्षेत्रांत गुंतवणूक करणारी सिलिकॉन व्हॅली या बँकेने भारतातील २१ स्टार्ट-अप (नवीन उद्योगव्यवसाय चालू करणार्या) आस्थापनांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामळे ही बँक बुडाल्याचा परिणाम भारतावरही होणार आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेकडून निधी प्राप्त करणार्या भारतीय आस्थापनांमध्ये ब्लूस्टोन, कारवाले, इनमोबी, पेटीएम्, पेटीएम मॉल, वन ९७ कम्युनिकेशन, नॅपटोल आदींचा समावेश आहे. मात्र, २०११ पासून सिलिकॉन व्हॅली बँकेने भारतात फारशी गुंतवणूक केलेली नाही. ही बँक बुडाल्यामुळे भारतातील शेअर बाजारातही मोठी घसरण झाली.
इलॉन मस्क यांची सिलिकॉन व्हॅली बँक विकत घेण्याची सिद्धता !
(सौजन्य : Biz Tak)
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती, तसेच टेस्ला, टि्वटर या आस्थापनांचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनी सिलिकॉन व्हॅली बँक विकत घेण्याची सिद्धता दर्शवली आहे.