घसा दुखत असतांना नामजप केल्यावर योग्य दिशेने औषधोपचार चालू होऊन त्रास न्यून झाल्याची नवसारी (गुजरात) येथील सौ. शीतल माने यांना आलेली अनुभूती
‘२५.१.२०२३ या दिवशी रात्रीपासून धुळीमुळे माझा घसा दुखत होता. त्यामुळे मला बोलायला आणि गिळायला त्रास होत होता, तसेच मला तापही आला होता.
१. आधुनिक वैद्यांनी दिलेली औषधे घेऊन आणि अन्य उपाय करूनही वेदना न्यून न होणे
आधुनिक वैद्यांना दाखवल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तुमच्या घशात जंतूसंसर्ग झाला आहे.’’ त्यासाठी त्यांनी मला ‘अँटिबायोटिक्स’ची औषधे दिली. ती मी घेत होते, तसेच ३ दिवस दिवसातून ४ वेळा वाफ घेत होते आणि गुळण्याही करत होते, तरीही पुष्कळ कफ पडत होता आणि माझ्या छातीच्या बरगड्यांमध्ये वेदना होत होत्या. आवंढा गिळतांना माझा घसा पुष्कळ दुखत होता. माझे नाक चोंदल्यामुळे मला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि माझे डोकेही दुखत होते.
२. उत्तरदायी साधकाने पाठवलेल्या नामजपामुळे झालेले लाभ !
२ अ. घसा दुखण्याचे प्रमाण अल्प होणे : त्यानंतर मी उत्तरदायी साधकाने मला सांगितलेला ‘श्री दुर्गादेव्यै नमः। , श्री हनुमते नमः।, श्री हनुमते नमः।, ॐ नमः शिवाय ।, ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप प्रतिदिन १ घंटा करायला आरंभ केला. मी आधुनिक वैद्यांनी दिलेली औषधेही नियमित घेत होते. त्यामुळे हळूहळू माझा घसा दुखणे न्यून होत गेले.
२ आ. घशातील ‘टॉन्सिल्स’ना सूज आली असल्याचे आधुनिक वैद्यांच्या लक्षात येऊन त्यांनी त्यावर ‘स्प्रे’ मारणे : पुन्हा मी आधुनिक वैद्यांकडे गेले, तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुमच्या घशातील ‘टॉन्सिल्स’ना सूज आली आहे.’’ त्यांनी माझ्या घशात एक ‘स्प्रे’ मारला. त्यामुळे मला थोडे बधीर झाल्यासारखे वाटले. नंतर मला उलटी झाली आणि त्यातून घशावर आलेला पांढरा थर (‘इन्फेक्शन’) पडून गेला. उलटी होतांना मला पुष्कळ त्रास झाला; मात्र पहिल्या ३ दिवसांच्या तुलनेत आता मला पुष्कळ बरे वाटत आहे.
२ इ. नामजप मिळाल्यामुळे ‘पुढील उपचार योग्य प्रकारे चालू झाले’, असे वाटणे आणि नामजप सहजतेने होऊ लागणे : गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेमुळे मला योग्य नामजप मिळाला. नामजप करायला आरंभ केल्यानंतर ‘माझ्यावर योग्य प्रकारे उपचार चालू झाले’, असे मला वाटले. कालपर्यंत मला प्रयत्नपूर्वक नामजप करावा लागत होता; मात्र आज पहाटेपासून तो सहजतेने होऊ लागला. त्यामुळे माझी झोपही पूर्ण झाली.
गुरुदेवांच्या कृपेमुळे मला वेळेत योग्य नामजप आणि उपचार मिळाल्यामुळे माझे सर्व त्रास दूर झाले. नामजपामुळे मला औषधांचा उपयोग होऊ लागला. त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. शीतल माने, नवसारी, सुरत, गुजरात. (२९.१.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |