राज्यातील गड-दुर्ग, मंदिरे आणि संरक्षित स्मारके यांच्या संवर्धनासाठी ‘जिल्हा महावारसा सोसायटी’ स्थापन करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – राज्यातील गड-दुर्ग, मंदिरे आणि महत्त्वाची संरक्षित स्मारके यांच्या संवर्धनासाठी शासकीय निधीसमवेत बाह्यस्रोतांद्वारे निधी उपलब्ध व्हावा आणि त्यांचे जिल्हास्तरावर योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावे, या हेतूने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ‘जिल्हा महावारसा सोसायटी’ स्थापन करण्याचे विचाराधीन आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ९ मार्च या दिवशी विधान परिषदेत लेखी तारांकित प्रश्नाद्वारे दिली आहे. सदस्य श्रीकांत भारतीय, अभिजित वंजारी, सतेज पाटील, अशोक जगताप, राजेश राठोड, डॉ. प्रज्ञा सातव आदी सदस्यांनी हा तारांकित प्रश्न विचारला होता.
राज्यातील गड-दुर्ग, मंदिरे आणि महत्त्वाची संरक्षित स्मारके इत्यादींच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून पुढील ३ वर्षांसाठी ३ टक्के निधीची तरतूद करण्याविषयी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा प्रश्न सदस्यांनी विचारला होता. त्याला मंत्री मुनगंटीवार उत्तर देतांना म्हणाले की, राज्यात एकूण ३८६ राज्य संरक्षित स्मारके घोषित करण्यात आली आहेत. वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून पुढील ३ वर्षांसाठी ३ टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे.