राज्यातील पोलीस पाटील यांचे मानधन वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – राज्यातील गावपातळीवर कार्यरत पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाच्या अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे, तसेच या पोलीस पाटील यांच्या मागण्यांविषयी आणि आवश्यक सुधारणा करण्यासाठी शासनस्तरावर समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीने दिलेल्या अहवालानुसार पोलीस पाटील यांचे प्रश्न सोडवले जातील, तसेच पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ होण्याविषयी सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० मार्च या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नात दिली. भाजपचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील पोलीस पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले मानधन ३ सहस्र रुपयांवरून ६ सहस्र ५०० रुपयांपर्यंत केले आहे. पोलीस पाटील यांच्या नियुक्तीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक दाखल्यांची पूर्तता करून ती प्रक्रिया वेळेत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या काळात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना ५० लक्ष रुपयांचे साहाय्य करण्यात आले आहे. यामध्ये पात्र असलेले आणखी कुणी वंचित राहिले आहेत का ? याची फेरपडताळणी करून कोरोनाने मयत झालेल्या पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्यात येईल.