मुलाला पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणारे ठाणे येथील श्री. प्रसन्न ढगे (वय ६० वर्षे)
फाल्गुन कृष्ण चतुर्थी (११.३.२०२३) या दिवशी ठाणे येथील श्री. प्रसन्न ढगे यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. अपूर्व ढगे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. श्री. अपूर्व ढगे यांनी ‘हॉटेल मॅनेजमेंट’चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ते बेकरीच्या संदर्भातील सेवा करतात.
श्री. प्रसन्न ढगे यांना ६० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
१. लहानपणापासून अनेक बंधने घालणे आणि ‘ती आपल्या भल्यासाठीच होती’, हे लक्षात आल्यावर कृतज्ञता वाटणे
‘मी महाविद्यालयात असतांना मला ‘चुलत भावंडांसह चारचाकीने बाहेर फिरायला जावे’, असे वाटत असे; पण बाबा मला पाठवत नसत. काही गोष्टींत बाबा मला बंधने घालत असत. त्या वेळी मला त्यांचा राग यायचा. त्यानंतर एकदा भावंडांशी बोलत असतांना एक भाऊ मला म्हणाला, ‘‘तुला तुझ्या बाबांनी लहानपणापासून बंधनात ठेवले आहे. त्यामुळेच तुझे आतापर्यंत सर्वकाही सुरळीत झाले आहे.’’ हे ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि माझ्या मनातील नकारात्मक विचार नष्ट झाले. तेव्हा ‘बाबा मला लहानपणी जे काही सांगायचे, ते माझ्या भल्यासाठीच होते’, हे माझ्या लक्षात आले.
२. मुलाला पूर्णवेळ साधना करण्यास प्रोत्साहन देणे
अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पूर्णवेळ साधनारत होण्याविषयीची चौकट प्रसिद्ध होत असे. तेव्हा प्रत्येक वेळी बाबा मला ती चौकट आणि ‘तुला आश्रमात लवकर जायचे आहे ना ?’, असा संदेश मला ‘व्हॉट्सॲप’वर पाठवत असत.
आ. बाबा मला पुष्कळ वेळा म्हणत असत, ‘‘अपूर्व, ‘तुला गोव्याचे आगगाडीचे तिकीट काढून द्यावे आणि रामनाथी आश्रमात पाठवावे’, असे मला वाटते.’’
इ. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी वर्ष २०१७ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा आणि साधना करण्यासाठी आलो. मी पूर्णवेळ साधना करायला लागल्यानंतर अनेकदा बाबांना आर्थिक अडचणी आल्या; पण त्यांनी मला कधीही ‘नोकरी कर’ किंवा ‘त्यांना साहाय्य हवे आहे’, असे सांगितले नाही.
ई. पुष्कळ वेळा माझ्या मनात विचार यायचे,‘आई-बाबांचे कसे होणार ? त्यांना काही अडचण आली तर ? आपल्याला पुन्हा नोकरी करावी लागेल का ?’ हे मी माझ्या आई-बाबांना सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तू आमची काहीच काळजी करू नकोस. तू केवळ साधनेकडे लक्ष दे. सर्व नीट होईल.’’
३. कलाक्षेत्राचा अनुभव असूनही सेवा आणि साधना करणे
बाबा ‘कलासरगम’ या संस्थेत कार्यरत होते. त्यांची संस्था गाण्यांचे कार्यक्रम आणि नाटके करत असे. त्यांना या क्षेत्रातील पुष्कळ अनुभव आहे. ते या क्षेत्रात राहिले असते, तर निश्चितच उत्तम नेपथ्यकार झाले असते; पण साधनेत आल्यावर त्यांनी या गोष्टींकडे फार लक्ष दिले नाही आणि आता तर ते अनेक वर्षांपासून सेवा अन् साधनाच करत आहेत.
४. त्यांचे अनेक मित्र प्रतिष्ठित आहेत; पण त्यांनी मित्रांच्या ओळखीने कधी स्वतःचे काम करवून घेतले नाही.
५. इतरांना साहाय्य करणे
रात्री-अपरात्री कोणत्याही वेळी कुणीही बाबांकडे साहाय्य मागितले, तर ते लगेच धावून जातात; म्हणून पुष्कळ जणांना त्यांचा आधार वाटतो.
६. सेवेची तळमळ
बाबा मागील अनेक वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्याची सेवा करतात. पहाटे ५ – ५.३० वाजता ते दैनिकाचा गठ्ठा घेण्यासाठी जातात. ते दैनिकाचे गठ्ठे सिद्ध करून साधकांना देतात आणि नंतर स्वतः दैनिकाचे वितरण करतात. त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, तरी ‘गुडघे दुखतात; म्हणून दैनिकाचे वितरण केले नाही’, असे कधी झाले नाही. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, म्हणजे गुरुदेवांचा संदेश सर्वांपर्यंत पोचवणे’, असा त्यांचा भाव असतो.
७. अल्प अहं
अ. बाबांचे मराठी कलाक्षेत्रात अनेक मित्र आहेत. त्यांनी अनेक दिग्गज मराठी कलाकारांसह काम केले आहे; पण त्याचा त्यांना कधीच अहं नव्हता.
आ. बाबांना पुष्कळ लोक ओळखतात. पुष्कळ वेळा मोठे ग्रंथप्रदर्शन लावायचे असतांना तंबू बांधावा लागतो. त्यासाठी साधकांना हातगाडीवरून बांबू न्यावे लागतात. तेव्हा बाबा साधकांसह हातगाडी ओढायचे. त्याची त्यांना कधीच लाज वाटली नाही.
८. बाबा कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधानी असतात. आनंद असो किंवा दुःख; ते प्रत्येक परिस्थितीत स्थिर असतात.
९. गुरुदेवांवर अपार श्रद्धा असणे
देवाने त्यांना आतापर्यंत अनेक कठीण प्रसंगांतून वाचवले, शिकवले आणि स्थिर ठेवले आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर त्यांची अतूट श्रद्धा आहे. बाबांना अनेक वेळा व्यावहारिक अडचणी येतात. तेव्हा ते गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे स्थिर आणि शांत असतात.
परात्पर गुरुदेव स्वतः माझी काळजी घेतच आहेत; पण बाबांच्या माध्यमातूनही ते माझी काळजी घेत आहेत. ‘असे बाबा मला लाभले’, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. अपूर्व प्रसन्न ढगे (श्री. प्रसन्न ढगे यांचा मुलगा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०२३)