लाखो भाविकांच्या उपस्थितीत देहू (पुणे) येथे ‘तुकाराम बीज’ सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

देहू (जिल्हा पुणे) – येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा ३७५ वा बीज सोहळा ९ मार्च या दिवशी भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून लाखोंच्या संख्येने वारकरी देहूनगरीत आले होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे या दिवशी सदेह वैकुंठगमन झाले असल्यामुळे हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो.

पहाटे ३ वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली. ४ वाजता संस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष मंडळ, वंशज आणि वारकरी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा झाली. पहाटे ६ वाजता वैकुंठगमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली. सकाळी १०.३० वाजता पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले. दुपारी १२ वाजता ‘नांदुरकी वृक्षा’वर फुलांची उधळण करून मनोभावे हात जोडत वारकरी नतमस्तक झाले.