सुरण कसे लावावे ?
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ९३
‘सुरण ही लागवड करण्यास अतिशय सोपी आणि अनेक औषधी गुणधर्म असलेली कंद भाजी आहे. सुरणाच्या गोलाकार कंदाला जो फुगीर भाग (डोळा) असतो, तेथून नवीन कोंब फुटतो. या कोंबाची लागवड करून नवे रोप लावता येते. भाजीवाल्यांकडून सुरणाचा कंद कोंब आलेल्या भागासहित घेतल्यास घरच्या घरी त्याची सहज लागवड करणे शक्य होते.
सुरणाची लागवड उन्हाळ्याच्या कालावधीत करावी. लागवड करण्यापूर्वी कंदाचा लहान कोंब आलेला तुकडा ८ – १० दिवस एका वाटीत पाण्यामध्ये ठेवावा. हे पाणी एक दिवसाआड पालटत रहावे. असे केल्याने कोंब मोठा होण्यास आणि कंदाला मुळे फुटण्यास आरंभ होतो. नंतर तो कंद मातीत लावावा. पावसाळ्याच्या कालावधीत सुरणाचे रोप मोठे होते आणि पावसाळ्यानंतर त्याची पाने पिवळी होऊ लागतात. लागवडीपासून साधारण ७ – ८ मासांत सुरणाचा नवीन कंद भूमीखाली सिद्ध होतो. ही लागवड मोठ्या आकाराच्या कुंडीतही सहज करता येते. सुरणाला ऊन अल्प प्रमाणात मिळाले, तरी चालते; तसेच या झाडावर कीडही अल्प प्रमाणात येत असल्याने लागवडीनंतर विशेष काळजी घ्यावी लागत नाही. ’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२७.२.२०२३)