श्री. वसंत (अण्णा) धाडकर यांच्या प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयीच्या हृद्य आठवणी आणि त्यांना आलेल्या अनुभूती !
९.३.२०२३ या दिवशीच्या दैनिकात आपण या अनुभूतींचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर करा : https://sanatanprabhat.org/marathi/660750.html
७. श्री. वसंत धाडकर यांना आलेल्या अनुभूती
७ आ. श्री. वसंत (अण्णा) धाडकर यांना जठराग्नीविषयी आलेली अनुभूती
७ आ १. जेवण झाल्यावर ‘स्वतःच्या पोटात होमकुंड पेटले आहे’, असे जाणवणे : एकदा मी सौ. संध्या (पत्नी) आणि दोन्ही मुले यांच्यासह जेवायला बसलो होतो. जेवण झाल्यावर मला वाटत होते, ‘माझ्या पोटात होमकुंड पेटले आहे आणि ते अन्नाची आहुती मागत आहे.’ तेव्हा मी सौ. संध्याला म्हणालो, ‘‘माझ्या पोटात होमकुंड पेटले आहे आणि त्याला अन्नाची आहुती पाहिजे. मी शिल्लक असलेल्या अन्नाची आहुती दिली, तर चालेल का ?’’ त्यावर ती ‘हो’ म्हणाली.
७ आ २. पुन्हा जेवतांना प्रत्येक घासाच्या वेळी वेगवेगळ्या देवतांची नावे तोंडात येऊन त्यांना अन्नाची आहुती दिली जाणे आणि त्या जेवणाचा कुठलाही त्रास न होणे : मी पुन्हा जेवायला आरंभ केला आणि पोटातील होमकुंडात प्रत्येक घासाच्या वेळी देवाचे नाव घेत अन्नाची आहुती देऊ लागलो. शेवटी ३ पोळ्या शिल्लक राहिल्या. मी सौ. संध्याला म्हणालो, ‘‘त्या पोळ्यांचा कुस्करा करून त्यात तूप आणि गूळ घाल.’’ तिने तसे केले. त्याची आहुती देतांना शेवटच्या तीन घासांच्या वेळी माझ्याकडून ‘अहं तृप्तास्मि, अहं तृप्तास्मि, अहं तृप्तास्मि ।’, असे म्हटले गेले आणि होमकुंड शांत झाले. ‘याचा मला त्रास होईल’, असे घरातील सर्वांना वाटले; पण असे काही झाले नाही. ‘अन्नाची आहुती पोटात जातांना प्रत्येक घासाला माझ्या तोंडात वेगवेगळ्या देवतांची नावे आपोआप कशी येत होती ?’, याचे माझे मलाच आश्चर्य वाटत होते.
७ आ ३. प.पू. भक्तराज महाराज यांच्या सहवासात असतांना अनेकदा भूक न शमणे आणि त्यांना याविषयी सांगितल्यावर हळूहळू भूक शमू लागणे : मी श्री महाराजांच्या सहवासात असतांना कित्येक वेळा कितीही खाल्ले, तरी माझ्या भुकेचे शमन व्हायचे नाही. याविषयी मी श्री भक्तराज महाराज यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘सारख्या सारख्या नामस्मरणाच्या घर्षणाने आपल्या पोटातील जठराग्नी प्रज्वलित होत असतो. त्यामुळे तुला असे होते. त्यासाठी मी तुला अंजिराचा पाक करून देईन, म्हणजे असे होणार नाही.’’ त्यांनी अंजिराचा पाक करून दिला नाही; पण त्यांनी असे म्हटल्यानंतर हळूहळू माझ्या भुकेचे शमन होऊ लागले. ‘जेवणाच्या शेवटी दूध, भात आणि साखर मिसळून खाल्ल्याने पोटातील जठराग्नी शांत होतो’, असे मी प.पू. मुक्तानंद यांच्या पुस्तकात वाचले होते.’
७ इ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेने श्री. पागे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता येणे
७ इ १. श्री. पागे यांच्याकडे गेलो असतांना त्यांनी विचारलेला प्रश्न : ‘वर्ष १९६८ मध्ये एकदा मी श्री. पागे यांच्याकडे गेलो असतांना त्यांनी मला प्रश्न विचारला, ‘‘आपण इतक्या वर्षांपासून श्री भक्तराज यांच्या समवेत असता. त्यातून तुम्हाला काय मिळाले ?’’ प्रश्न एका विद्वान भक्ताने केला होता आणि तिथे जमलेले (त्यांची बायको एम्.ए. होती.) सर्व विद्वान होते. मी केवळ श्री भक्तराज महाराज यांचा भक्त ! मला केवळ भक्ती, भजन आणि गुरुचरण एवढेच ठाऊक होते. ‘या प्रश्नाला अन् त्यातील भावनांना कसे उत्तर द्यावे ?’, असा प्रश्न मला पडला.
७ इ २. गुरु महाराज आणि श्री गणेश यांचा धावा केल्यावर प्रश्नाचे उत्तर सुचणे अन् ते उत्तर ऐकून सगळ्यांना पुष्कळ आनंद होणे : मी मनात गुरु महाराजांचा धावा केला आणि चित्ताच्या ठिकाणी श्री गणेशाला आवाहन केले अन् काय आश्चर्य ! मला लगेचच उत्तर सुचले, ‘मी भक्तराज यांच्या जवळ येण्यापूर्वी जरा मलिन (विचार आणि भक्ती यांनी) होतो. त्यांच्या सहवासात आल्यावर त्यांनी माझ्यातील मलिनता दूर करून मला दुधासारखे पांढरे, म्हणजे स्वच्छ केले. त्यानंतर अहंकार येऊ नये; म्हणून त्याला विरजण लावून त्यांनी त्याचे दही बनवले. नुसते दह्यासारखे घट्ट राहू नये; म्हणून त्याला भक्तीरसाच्या रवीने घुसळून त्याचे लोण्यात रूपांतर केले. आता माझी स्थिती लोण्यासारखी आहे. आता मला कुणी दूध किंवा दही बनवू शकत नाही अन् मला तूप बनण्याचीही इच्छा नाही.’ हे ऐकून त्या सर्वांना फार आनंद झाला.
७ इ ३. भक्तांनी लोण्यासारखे असावे ! : गुरु महाराजांनी सुचवलेल्या उत्तरात किती गांभीर्य भरले होते ! कृष्णाला लोणी फार प्रिय होते. तो नेहमी लोण्याचा आस्वाद घेत असे. लोणी किती भाग्यवान ! ते परमेश्वराच्या तोंडाला लागायचे. आपण जे अन्नपदार्थ खातो, ते आपल्याला पचवावे लागतात; मात्र लोणी पचवावे लागत नाही, ते आपोआपच पचते. भक्तांनी लोण्यासारखे असावे. भक्तांनी आपल्या भक्तीला असेच पचवावे. (म्हणजे भक्तीचा अहंकार होऊ देऊ नये.)
७ ई. प.पू. भक्तराज महाराज यांनी श्री. धाडकर यांचा पोटाचा अल्सर बरा होण्यासाठी पपई आणि दूध यांवर रहाण्याचे त्यांचे व्रत करणे अन् व्रत पूर्ण झाल्यावर श्री. धाडकर यांचा अल्सर बरा होणे
७ ई १. अल्सरचा त्रास चालू झाल्यावर दत्तजयंतीच्या आधी एक आठवडा ‘पूर्ण सप्ताह केवळ दूध आणि पपई खायची’, असे ठरवणे : वर्ष १९७५ मध्ये पुन्हा स्थानांतर होऊन मी महू येथे आलो. मालगाडीच्या ‘गार्ड’ची नोकरी होती. ती फार कठीण होती. नोकरीसाठी नेहमी मला रात्री-अपरात्री जावे लागे. त्यामुळे मला पोटाचा अल्सर झाला होता. औषध चालू होते; पण पाहिजे तसा परिणाम होत नव्हता. दत्तजयंतीच्या एक आठवडा आधी मी मनात संकल्प केला, ‘पूर्ण सप्ताहभर दूध आणि पपई खाऊन रहायचे.’ मी नोकरीवर जातांना समवेत पपई नेत होतो आणि दूध कुठल्याही रेल्वेस्थानकावर मिळायचे.
७ ई २. प.पू. भक्तराज महाराज यांच्यासाठी पपई घेऊन जाणे आणि पपईचे छोटे छोटे तुकडे करून महाराजांसमोर एका ताटलीत ठेवणे : याच सप्ताहात गीता जयंती असते. गीता जयंतीनिमित्त डॉ. कमलापुरे यांनी श्री भक्तराज महाराज यांना बोलावले होते. (श्री भक्तराज महाराज यांचे परम भक्त डॉ. कमलापुरे हे पशू वैद्यकीय महाविद्यालयात (व्हेटरनरी कॉलेजमध्ये) ‘हेड ऑफ द डिपार्टमेंट’ या पदावर होते. ते एक वर्ष अमेरिकेला जाऊन आले होते. ते निःस्वार्थी आणि निर्व्यसनी होते. त्यांचा अनेक विषयांचा परिपूर्ण अभ्यास होता. त्यांचे श्री भक्तराज महाराज यांच्यावर निस्सीम प्रेम होते. वर्ष १९८० मध्ये त्यांनी श्री भक्तराज महाराज यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमाचा पूर्ण कार्यभार सांभाळला होता. श्री भक्तराज यांच्या समवेत पुष्कळ भक्त होते. मी त्याच दिवशी नोकरीवरून परत आलो होतो. मला डॉ. कमलापुरे यांच्या मुलाने सांगितले, ‘‘महाराज आले आहेत आणि त्यांनी तुम्हाला बोलावले आहे.’’
मी श्री भक्तराज महाराज यांच्या दर्शनासाठी जायला निघाल्यावर माझा क्रमांक दोनचा मुलगा राजू म्हणाला, ‘‘आता तुमच्या नियमाचे कसे होणार ? कारण भक्तराज महाराज तुम्हाला जेवायला लावतील.’’ मी त्याला म्हणालो, ‘‘जर ते मला ‘जेवा’ म्हणाले, तर त्यांच्या ताटात जे उष्टे राहिले असेल, त्याचेच मी सेवन करीन.’’ असे सांगून मी त्यांच्या दर्शनासाठी निघालो. बाजारातून ४ – ५ किलो वजनाची मोठी पपई घेतली आणि डॉ. कमलापुरे यांच्याकडे गेलो. तेव्हा महाराज विश्राम करत होते आणि बाकीचे जेवत होते. मी आणलेल्या पपईकडे पाहून डॉ. कमलापुरे म्हणाले, ‘‘महाराजांना पपई आवडत नाही.’’ त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी पपई चांगली धुतली आणि साल काढून तिचे छोटे छोटे तुकडे करून चांगल्या ताटलीत ठेवले अन् चमचाही ठेवला.
७ ई ३. प.पू. भक्तराज महाराज यांनी पपईकडे पाहून ‘मी ७ दिवस दूध आणि पपई यांवरच रहायचे ठरवले आहे’, असे सांगून ताटलीतील सर्व पपई खाणे आणि त्यानंतर साधकाचा अल्सर हळूहळू बरा होणे : थोड्या वेळाने महाराज उठले. त्यांच्यापुढे ताटली ठेवून मी त्यांना नमस्कार केला. ती ताटली हातात घेऊन ते म्हणाले, ‘‘मी ७ दिवस पपई आणि दूध यांवरच रहायचे ठरवले आहे.’’ हे ऐकून माझे अंतःकरण गहिवरून आले आणि आनंदही झाला. त्यांनी ताटलीतील सर्व पपई खाल्ली. अशा प्रकारे त्यांनी माझे व्रत पूर्ण केले. आनंदाची गोष्ट म्हणजे जसजसे माझे ७ दिवसांचे व्रत पूर्ण झाले, तसतसा माझा अल्सरही हळूहळू बरा झाला. आजपर्यंत पुन्हा मला त्याचा त्रास झाला नाही.’
७ उ. भुसावळ येथील विदेही संत प.पू. झिप्रूअण्णा यांच्या संदर्भात आलेली अनुभूती
७ उ १. विदेही संत झिप्रूअण्णा ! : भुसावळच्या जवळ नसीराबाद नावाचे लहान एक गाव आहे. तिथे झिप्रूअण्णा नावाचे मोठे विदेही संत होऊन गेले. तिथे त्यांची समाधी आहे. ते विदेही अवस्थेत गावात फिरायचे आणि कुणालाही ‘बिडी दे, बिडी दे’, असे म्हणायचे. त्यांच्या विदेही अवस्थेचे वर्णन, म्हणजे ते आपली विष्ठा आपल्याच अंगाला लावायचे आणि त्याला चंदनासारखा सुगंध यायचा. जिथे त्यांची समाधी आहे, तिथे एक लहान नदी वहाते. त्या नदीत पाणी असतांना ते ३ – ३ दिवस खोल पाण्यात जाऊन बसत.
७ उ २. विदेही संत झिप्रूअण्णा यांना अनुभूती देण्यासाठी प्रार्थना करणे आणि ती प्रार्थना फलद्रूप होणे : त्यांच्या समाधीला अंतःकरणपूर्वक वंदन करून मी तिथे मस्तक टेकवले आणि त्यांना विनंती केली, ‘मी आपल्या दर्शनाला आल्याने तुम्हाला आनंद झाला असेल, तर माझी आपल्याला विनंती आहे, ‘मी आज रात्रीच्या गाडीने मुलुंडला जात आहे. तिथे आमचे सद्गुरु श्री भक्तराज महाराज आले आहेत. जेव्हा मी त्यांच्या दर्शनाला जाईन, तेव्हा ते मला काहीतरी खात असलेले दिसावेत आणि जेव्हा मी त्यांना नमस्कार करीन, तेव्हा ते जे खात असतील, ते सर्व त्यांनी मला द्यावे.’
मी श्री भक्तराज महाराज यांच्या दर्शनासाठी श्री. दादा दळवी यांच्या घरी गेलो. तेव्हा सकाळचे साधारण ९ वाजले होते. श्री भक्तराज महाराज गादीवर बसून हातात ताटली घेऊन चमच्याने काहीतरी खात होते. हे पाहून माझ्या मनात आले, ‘हे तर खरे ठरले.’ मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार करून उठल्यावर त्यांनी त्यांच्या हातातील खाऊची ताटली माझ्या हातात ठेवली.
७ ऊ. पंढरपूर येथे आलेली अनुभूती ! : एकदा मी रामजीला (प.पू. रामानंद महाराज यांना) विचारले, ‘‘विठोबा येथे किती वर्षांपासून उभा आहे ?’’ विठ्ठल मंदिरात जातांना एका दुकानात खंजिरी दिसल्यावर ती घेण्यासाठी महाराजांसह काही जण दुकानात गेले. मी, रामजी आणि छोटू ऊन असल्याने समोरील दुकानाच्या ओट्यावर बसलो. इतक्यात समोरून थोड्या अंतरावर एक बडवे येतांना दिसले. त्यांना पाहून मी रामजीला (प.पू. रामानंद महाराज यांना) म्हणालो, ‘‘ओहो, काय बडवे आहेत !’’ त्यांची उंची जवळजवळ ६ फूट होती. त्यांच्या शरिराचा बांधा वरपासून खालपर्यंत अगदी मजबूत होता. त्यांचा रंग सावळा असून त्यांच्या चेहर्यावर एक प्रकारचे तेज दिसत होते. त्यांच्या डोक्यावरचे केस अगदी लहान होते. ‘पायात खडावा, घट्ट खोचून नेसलेले पांढरे शुभ्र धोतर आणि अंगावर पांढरा पंचा’, असे त्यांचे रूप दिसत होते. ते सरळ आम्ही बसलो होतो, तिथे माझ्या समोर येऊन थांबले आणि म्हणाले, ‘‘इंदूरहून आलेले आणि होळकरांच्या वाड्यात उतरलेले ते तुम्हीच का ? विठोबा येथे एक सहस्र वर्षांपासून उभा आहे.’’ असे म्हणून ते पुढे गेले. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले, ‘माझ्या प्रश्नाचे उत्तर या बडव्यांनी कसे दिले ?’ नंतर ते गेले, त्या बाजूला पाहिल्यावर मला ते दिसले नाहीत.
७ ए. प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना केल्यावर श्री. धाडकर यांनी खुणा करून दिलेले प्रश्न मुलाच्या परीक्षेत येणे आणि तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणे : माझ्या मोठ्या मुलाच्या परीक्षेला एक मास राहिला होता. मी पूजा करत असतांना त्याने त्याची सर्व पुस्तके माझ्या समोर आणून ठेवली. मी मनात सद्गुरूंचे स्मरण करून त्यांना अंतःकरणपूर्वक नम्र विनंती केली, ‘मी मुलाला ‘तुला प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करीन’, असे वचन दिले आहे. यासाठी मी त्याच्या पुस्तकातील ज्या प्रश्नावर खुणा करीन, तेच प्रश्न परीक्षेत येऊ दे. मी आपणांस असा त्रास द्यायला नको; परंतु ‘त्याची श्रद्धा बसावी आणि उद्दीष्ट पूर्ण व्हावे’, यासाठी मी गुरु महाराजांना विनंती करत आहे.’ अशी प्रार्थना करून मी त्याच्या पुस्तकातील प्रश्नांवर खुणा केल्या आणि त्याला सांगितले, ‘‘ज्या प्रश्नांवर खुणा केल्या आहेत, त्यांचा अभ्यास आधी कर. नंतर इतर प्रश्नांचा अभ्यास कर.’’ त्याप्रमाणे खरोखर सद्गुरूंच्या कृपेने खुणा केलेलेच प्रश्न परीक्षेत आले आणि तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.’ (समाप्त)
– श्री. वसंत (अण्णा) धाडकर, इंदूर, मध्यप्रदेश.
(साभार : भक्तराज गारुडी आला)
प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितलेला ‘हरि ॐ तत्सत्’चा अर्थ‘हरि ॐ तत्सत्’ या मंत्राचा अर्थ सांगतांना श्री भक्तराज महाराज म्हणाले, ‘‘हे हरि, ‘तुझ्यामध्ये ‘ॐ’रूपी तत्त्व भरले आहे’, हे सत्य आहे.’’ – श्री. वसंत (अण्णा) धाडकर, इंदूर, मध्यप्रदेश. (साभार : भक्तराज गारुडी आला) |
|