सिंधुदुर्ग : कळणे येथील शेतकरी दीड वर्षानंतरही हानीभरपाई पासून वंचित
दोडामार्ग – तालुक्यातील कळणे खाण प्रकल्पाच्या खाणीची भिंत कोसळून तेथील शेतकरी आणि बागायतदार यांची हानी झाली होती. या घटनेला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला, तरी प्रशासनाकडून कोणतीही नोंद घेतली गेलेली नाही. त्यामुळे ‘खाण आस्थापनाला प्रशासन पाठीशी का घालत आहे ?’, असा प्रश्न मनसेचे उपजिल्हा संघटक अभय पांडुरंग देसाई यांनी केला आहे.
तालुक्यातील कळणे येथे २९ जुलै २०२१ या दिवशी सकाळी ७.३० वाजता येथील खाण प्रकल्पाच्या खाणीची तटरक्षक मानवनिर्मित भिंत कोसळून खाणीतील खनिजयुक्त पाणी प्रचंड लोंढ्यासह धवडकी वाडीत आणि शेतभूमीत घुसले होते. या वेळी घरे, भातशेती, फळबाग, विहिरी, शेततळी, ग्रामीण पाणीपुरवठा नळयोजना यांची मोठी हानी झाली, तसेच अनेक झाडे प्रवाहाबरोबर वाहून गेली. या घटनेनंतर शेतकर्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. येथील हानीग्रस्तांनी विविध आंदोलने करूनही शासनाला जाग आली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि खनिकर्म (खाण) शाखा यांत काही आर्थिक व्यवहार झाले असावेत, असा संशय देसाई यांनी याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे.
संपादकीय भूमिकाअसे प्रकार जनतेला आंदोलने करण्यास आणि विकासकामांना असहकार्य करण्यास भाग पाडतात ! |