तापमानात अचानक झालेली वाढ, हे आग लागण्याचे कारण असू शकते ! – अग्नीशमन दलाचे संचालक
पणजी, ८ मार्च (वार्ता.) – गोव्यात ठिकठिकाणी लागलेल्या आगीमागे तापमानात अचानकपणे मोठ्या प्रमाणात झालेली वाढ हे कारण असू शकते, असा अंदाज अग्नीशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, ‘‘या दिवसांत तापमान ३२ अंश सेल्सियसवरून अचानकपणे वाढून ३७ ते ३८ अंश सेल्सियस झाले आहे. हे आग लागण्याचे कारण असू शकते. दुसरे कारण म्हणजे वीजवाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे किंवा रेल्वेचे रूळांवर झालेले घर्षण यामुळे शेजारी असलेल्या वाळलेल्या गवताला आग लागून ती पसरणे, हीसुद्धा कारणे असू शकतात. ३ मार्च ते ७ मार्च या कालावधीत अग्नीशमन दलाला २२० जणांनी संपर्क केला. त्यांपैकी २०५ संपर्क आगीसंदर्भात होते, तर १५ संपर्क इतर काही कारणासंबंधी होते.’’
Exponential Rise In Temperatures May Be a Reason For Fire Incidents, Says Goa Fire Director #goanews #news #localnews #goa https://t.co/l9XHT7Fnyr
— Goemkarponn (@goemkarponnlive) March 8, 2023
म्हादई अभयारण्यात लागलेल्या आगीसंदर्भात ते म्हणाले, ‘‘आमच्या वाळपई आणि डिचोली येथील अग्नीशमन दलाच्या केंद्रांना जे दूरध्वनी आले, त्यानुसार आम्ही आग लागलेल्या ठिकाणी गेलो असता जंगल असल्यामुळे वाहने पुढे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेरून आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु आग विझवल्यानंतर ती पुन्हा पसरण्याच्या काही घटना घडल्या. ८ मार्चला मुख्यमंत्री, वनमंत्री विश्वजित राणे आणि मुख्य सचिव यांच्या झालेल्या बैठकीत वन खाते, पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्यासह अग्नीशमन दलाच्या पथकाने एकत्रितपणे जंगलात जावे असे ठरले. आम्ही रात्री १ वाजता जंगलात गेलो. नौदलाच्या हेलिकॉप्टर्सनी वरून पाणी मारल्यानंतर आग आटोक्यात आली. त्यांचे आम्हाला पुष्कळ साहाय्य मिळाले. आगीचे नक्की कारण मी सांगू शकत नाही. वनखात्याचे अधिकारी या संदर्भात अधिक सांगू शकतील. जेव्हा आग प्राथमिक अवस्थेत असेल, तेव्हा लोकांनी अग्नीशमन दलाची प्रतीक्षा न करता स्वतः त्वरित आग विझवण्याचे प्रयत्न करावेत.’’
जंगलात अनेक ठिकाणी आग : आणखी हेलिकॉप्टर्स वापरणार ! – विश्वजित राणे
पणजी, ८ मार्च (वार्ता.) – गोव्यातील जंगलांमध्ये अनेक ठिकाणी आग लागली असून ती विझवण्यासाठी शासन आणखी काही हेलिकॉप्टरांचा वापर करणार आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी काणकोण ते सत्तरी या भागांतील जंगलांची हेलिकॉप्टरमधून पहाणी केल्यानंतर पत्रकारांना दिली.
Tomorrow morning, as per requirement, a helicopter of Indian Navy and another from Indian Air Force will take up sorties to douse the fire.
Close monitoring and supervision in all areas is being carried out by Forest Frontline staff.
— VishwajitRane (@visrane) March 8, 2023
ते म्हणाले, ‘‘अनेक ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी भारतीय लष्कर आणि नौदल यांनी साहाय्य देण्याचे आश्वासन दिले आहे. सकाळपासून आग लागलेल्या ठिकाणी हेलिकॉप्टर्सच्या साहाय्याने १४ ते १६ टन पाणी मारण्यात आले. आतापर्यंत १८ ठिकाणी आग आटोक्यात आणण्यात आली आहे. अवैधपणे वनात प्रवेश करणार्यांचा मला संशय आहे. असे जे लोक असतील, त्यांना अटक करण्याचे आदेश मी उप वनसंरक्षकांना दिले आहेत. ही आग म्हादई अभयारण्य, धिरोडे, साट्रे, कोटार्ली, अनमोड घाट, काले, धारबांदोडा आणि पर्रा या ठिकाणी अधिक प्रमाणात आहे. मी वन खात्याच्या कर्मचार्यांना पुन्हा कुठे आग लागली का ? याविषयीची माहिती प्रत्येक घंट्याला कळवण्यास सांगितले आहे.’’
नावता, कुठ्ठाळी येथील जंगलाला आग
मडगाव, ८ मार्च (वार्ता.) – नावता, कुठ्ठाळी भागातील डोंगरावर असलेल्या जंगलाला आग लागण्याची घटना घडली आहे. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यासाठी नौदलाचे साहाय्य घेतल्याचे स्थानिक आमदार आंतोनिओ वास यांनी सांगितले. येथील वन अधिकारी, सरकारी अधिकारी आणि स्थानिक नागरिक ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.