स्त्रियांनी राजकारणात यावे, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक ! – राज ठाकरे
मुंबई – सर्व चौकटी मोडून आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड चालू आहे, ती थक्क करणारी आहे. सर्वच ठिकाणच्या स्त्रिया जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे. १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. आज त्याच स्त्रिया समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणार्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचे संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आता स्त्रियांनी राजकारणातही यायला हवे. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणे’, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणार्या स्त्रियांनी राजकारणात यावे, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘फेसबूक’ पोस्टच्या माध्यमातून महिलांना केले.