बाळूमामा भंडारा यात्रा सुरळीत होण्यासाठी शासकीय यंत्रणेने सहकार्य करावे ! – प्रांताधिकारी वसुंधरा बारवे
आदमापूर (जिल्हा कोल्हापूर), ८ मार्च (वार्ता.) – मुदाळतिट्टा (तालुका भुदरगड) येथील सद़्गुरु बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रा उत्सवास १२ मार्चपासून प्रारंभ होत आहे. १९ मार्च ते २१ मार्च या कालावधीत मुख्य यात्रेचे दिवस असून त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत येणार्या भाविकांना वेळेत ‘श्रीं’चे सुलभ दर्शन मिळावे, महाप्रसादाचा लाभ घेता यावा, पार्किंगची समस्या उद़्भवणार नाही, वाहतुकीची कोंडी होणार नाही, अशा पद्धतीने योग्य नियोजन करा. यात्रेच्या निमित्ताने सर्व शासकीय यंत्रणांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचना प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी केल्या. येथील मंदिर सभागृहातील नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या.
या वेळी तहसीलदार अश्विनी अडसूळ, देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, सचिव रावसाहेब कोणकेरी हेही उपस्थित होते.
या बैठकीत यात्रेला होणारी गर्दी आणि नियंत्रण व्यवस्था, उपलब्ध सोयीसुविधा, पोलीस यंत्रणा, रथ मिरवणूक, महाप्रसाद वाटप, पाणीपुरवठा, आरोग्याचा प्रश्न, अतिक्रमण, विक्रेते, बेशिस्त पार्किंगमुळे होणारे अडथळे, आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यानंतर प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी प्रत्यक्ष मंदिर परिसराची पहाणी करून उपाययोजना सुचवल्या.