सद़्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांकडून करून घेतलेले भावजागृतीचे विविध प्रयोग !
गुरुवारी दत्तगुरूंच्या दैवी लोकात त्यांच्या दर्शनाला जाणे
‘कधी एकदा श्री दत्तगुरूंची भेट होईल’, या विचाराने आपण नामजप करत झपाझप पावले टाकत दर्शनाला जात आहोत. त्या वेळी वातावरणात पालट होत आहे. आपण श्री दत्तगुरूंच्या दैवी लोकात प्रवेश केला आहे. सगळीकडे सुंदर फुले आहेत. दीपज्योती लावल्या आहेत. वटवृक्ष दिसत आहेत. आपल्याला ब्रह्मा, विष्णु आणि शिव, या तिन्ही देवतांचे दर्शन होत आहे. आपण नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार करत आहोत. आपण तिन्ही देवतांना अंतःकरणापासून आळवत आहोत. त्यांची दृष्टी पडताच आपल्या भोवतालचे त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होत आहे. ‘प्रवास कसा झाला ?’, असे
श्री दत्तगुरु आम्हाला विचारत आहेत. श्री दत्तगुरूंनी हातात कमंडलू घेतले आणि त्यांनी आम्हाला दोन्ही हातांची ओंजळ करायला सांगितली. आपण श्री दत्तगुरूंनी दिलेले कमंडलूतील तीर्थरूपी अमृत प्राशन करत आहोत. आपण चैतन्य ग्रहण करत आहोत. आपण अमृताचा दैवी सुगंध घेत आहोत. श्री दत्तगुरूंच्या चरणी माथा ठेवल्यावर आपल्याकडून कृतज्ञता व्यक्त होत आहे. त्या वेळी ‘साक्षात् गुरुमाऊलींच्या चरणांवर मस्तक ठेवले आहे’, असा भाव दाटून येत आहे.
(क्रमशः)
– सद़्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था.
संग्राहक : श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे), पुणे (५.१.२०२३)