श्री. वसंत (अण्णा) धाडकर यांच्या प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयीच्या हृद्य आठवणी आणि त्यांना आलेल्या अनुभूती !
१. वडिलांच्या निधनानंतर ते काम करत असलेल्या ‘मिल’कडून काही रक्कम मिळाल्यावर श्री. धाडकर यांनी ती गुरुचरणी अर्पण करणे
‘माझे वडील ‘हुकूमचंद मिल’मध्ये कामाला होते. वर्ष १९६२ मध्ये माझी आई आणि वर्ष १९६४ मध्ये वडील स्वर्गवासी झाले. त्या प्रसंगी श्री भक्तराज महाराज स्वतः उपस्थित होते. वडिलांच्या निधनानंतर मला त्या ‘मिल’कडून ७ सहस्र रुपये मिळाले. ते सर्व मी गुरुचरणी अर्पण केले आणि त्यांना विनंती केली, ‘‘लोकमान्य नगर (इंदूर) येथे (३० × ५० चा) ‘प्लॉट’ २ सहस्र रुपयांपर्यंत मिळत आहे. तो घेतला, तर बरे होईल.’’ त्यानुसार तो ‘प्लॉट’ घेतला.
भजनांच्या वेळी तबला वाजवत असतांना श्री. वसंत (अण्णा) धाडकर यांना कधी कधी झोप येऊनही त्यांनी योग्य प्रकारेच तबला वाजवणे‘श्री. वसंत धाडकर आणि कै. पवार यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचा आनंद घेतला. श्री. वसंत धाडकर तबला वाजवायचा आणि श्री. पवार पेटी. माझ्याकडे झांज असायची. वसंत दिवसा कामावर जायचा आणि रात्री तबला वाजवायचा. कधी कधी त्याला तबला वाजवत असतांनाच झोप यायची; पण तो झोपेतही तबला बरोबरच वाजवत असे.’ – प.पू. रामानंद महाराज |
२. प.पू. भक्तराज महाराज यांचे आज्ञापालन न केल्याने १२ वर्षांनी गुरुमंत्र मिळणे
२ अ. प.पू. भक्तराज महाराज यांनी सोमवारी गुरुमंत्र घ्यायला यायला सांगूनही त्यांचे बोलणे गांभीर्याने न घेणे : वर्ष १९६५ मध्ये बढती मिळून माझे महू येथून पुन्हा उज्जैनला स्थानांतर झाले. वर्ष १९६६ मधील एका संध्याकाळी मी इंदूरला श्री. रामजीकडे (प.पू. रामानंद महाराज यांच्याकडे) श्री भक्तराज महाराज यांच्या दर्शनाला गेलो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘सोमवारी ये. पवार आणि छोटू यांना अन् तुला गुरुमंत्र देईन.’’ श्री भक्तराज यांचा सहवास, तसेच भजन आणि भोजन यांचा पुष्कळ आनंद मिळत असल्याने त्यांच्या या म्हणण्याकडे मी गांभीर्याने लक्ष दिले नाही.
२ आ. गुरुमंत्र घ्यायला न गेल्याने प.पू. भक्तराज महाराज रागावणे आणि पुढे १२ वर्षांनी गुरुमंत्र मिळणे : मी उज्जैनहून सोमवारी न येता मंगळवारी आलो. तेव्हा श्री भक्तराज महाराज चिडून मला म्हणाले, ‘‘मी तुला सांगितले होते, ‘सोमवारी ये.’ मी त्या दोघांना गुरुमंत्र दिला. आता माझी इच्छा होईल, तेव्हा तुला गुरुमंत्र देईन.’’ तेव्हा मला थोडे गहिवरल्यासारखे झाले; पण काहीच बोलता येत नव्हते. तो गुरुमंत्र त्यांनी मला १२ वर्षांनंतर नरसोबाच्या वाडीला कृष्णा नदीत उतरून दत्तपादुकांसमोर दिला. एका चुकीसाठी मला १२ वर्षे थांबावे लागले.
२ इ. गुरुमंत्राविषयी मनात शंका आल्यावर ‘प्रतिदिन स्नानानंतर गुरुमंत्राची केवळ एक माळ जपायची’, असे प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगणे आणि तेव्हा आश्चर्य वाटून आनंद होणे : श्री भक्तराज महाराज यांनी गुरुमंत्र माझ्या दोन्ही कानांत सांगितला; परंतु माझ्या मनात विचार आला, ‘मी सारखा ‘हरि ॐ तत्सत् ।’, या मंत्राचा जप करतो. आता गुरुमंत्राच्या जपाचे कसे काय जमायचे ?’ हा विचार माझ्या मनात येताक्षणीच गुरु महाराज माझ्या जवळ येऊन मला म्हणाले, ‘‘या गुरुमंत्राची केवळ एकच माळ स्नान झाल्यावर जपायची.’’ हे ऐकून माझ्या मनात आश्चर्य अन् आनंद यांचा संगम झाला.
३. महू येथील संत श्री सीतलसिंहजी (श्री संतजी) यांनी सेवा करून घेणे; पण त्यामुळे हळूहळू प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे जाणे न्यून होणे
महू येथील संत श्री सीतलसिंहजी (श्री संतजी) हे ‘ग्रंथसाहेब’चा पाठ करत. तो चालू केल्यापासून ४८ घंट्यांनी पूर्ण व्हायचा. तेव्हा ते माझ्याकडून पहाटे ४ ते ६ या वेळेत ग्रंथसाहेबजवळ उभे राहून चवरी डुलण्याची (वारा घालण्याची) सेवा करून घेत होते; पण त्यामुळे माझे श्री भक्तराज महाराज यांच्याकडे जाणे न्यून होऊ लागले. तेव्हा एकदा डॉ. आठवले यांनी महाराजांना विचारले, ‘‘अलीकडे श्री. वसंत धाडकर दिसत नाही.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आमचा चांगला चेला संतजींनी पळवून नेला.’’
४. देवासच्या काळे सरदारांना आलेली अनुभूती !
प्रत्येक शनिवारी देवासला भजन होत होते. तेव्हा श्री भक्तराज महाराज, रामजी, पवार आणि मी असायचो. एकदा देवासला काळे सरदारांकडे भजन आणि भोजन यांचा कार्यक्रम होता. तेव्हा इंदूर आणि देवास येथील पुष्कळ भक्तलोक आले होते; तसेच जे येतील, त्यांना महाराज जेवायला बसायला सांगत होते. काळे सरदारांना वाटले, ‘आता आपले नाव जाणार.’ अशा मनःस्थितीत असतांना महाराजांनी त्यांना आपल्या जवळच जेवायला बसवले. सर्वांची जेवणे झाले, तरी अन्न थोडे थोडे शिल्लक राहिले. हे पाहून काळे सरदारांच्या मनात महाराजांविषयी श्रद्धा निर्माण झाली.
५. प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन रंगले असतांना सरदार घराण्यातील मुली बोलत असणे आणि मुलींचे बोलणे थांबवण्यासाठी प.पू. महाराजांनी श्री. धाडकर यांच्या डोक्यावर चापटी मारून ‘तबला नीट वाजव’, असे सांगणे
भोजनानंतर भजनही चांगले रंगले. भजन रंगात आले असतांना महाराजांनी माझ्या डोक्यावर एक चापटी मारली आणि म्हणाले, ‘‘तबला नीट वाजव.’’ खरेतर मी तबला नीटच वाजवत होतो. भजन संपल्यावर महाराज मला म्हणाले, ‘‘एवढे छान भजन चालले असतांना माझ्या समोरील राजघराण्यातल्या मुली आपसात बोलत होत्या. त्यांना ‘बोलू नका’, असे कसे सांगणार ? म्हणून तुला मारले.’’ (तसाही मी पुष्कळ मार खाल्ला आहे; कारण सगळ्यांचा राग माझ्यावरच निघतो.) मला मारल्याने त्या मुली एकदम गप्प झाल्या.
६. श्री. धाडकर यांच्या मुलाच्या लग्नानंतर मेहताखेडीला परत जातांना प.पू. भुरानंद महाराज यांनी ‘माझे ३ मासांचे तप तुला भेट स्वरूपात दिले’, असे श्री. धाडकर यांना सांगणे
श्री प.पू. भुरानंदबाबा माझ्या मुलाच्या लग्नासाठी आले होते. गुरुकृपेने माझ्याकडून त्यांची सेवा घडली. लग्नानंतर ते मेहताखेडीला जाण्यास निघाले. तेव्हा मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केल्यावर ते मला म्हणाले, ‘‘वसंता, मेरे पास तुझे देनेके लिए कोई चीज नहीं है; परंतु मैं तुझे मेरा तीन मासका तप भेंट स्वरूप देता हूं ।’’
७. श्री. वसंत धाडकर यांना आलेल्या अनुभूती
७ अ. प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना करून अंघोळ केल्यावर ताप बरा झाल्याची आलेली अनुभूती !
७ अ १. ‘नित्य भजन आणि नियमित आहार असूनही ताप आला, तर तो आपल्याला आराम द्यायला आला आहे’, असे समजावे’, असे प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगणे : मला कधीतरी ताप यायचा. मी श्री भक्तराज महाराज यांना विचारले, ‘‘नित्य भजन आणि नियमित आहार असूनही मला ताप का यावा ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तू माझ्या जवळ नेहमी असतोस आणि नोकरी करत असतांना तुझ्या शरिराला आराम कुठे मिळतो ? तेव्हा ‘हा ताप आपल्याला आराम द्यायला आला’, असे समजावे.’’
७ अ २. महू येथे रहात असतांना सतत ५ दिवस ताप येणे : वर्ष १९६४ मध्ये माझे उज्जैनहून महू (मध्यप्रदेश) येथे स्थानांतर (बदली) झाले. मी रेल्वेच्या ‘क्वार्टर’मध्ये रहात होतो. तेव्हा एकदा मला ताप आला. त्या वेळी मला श्री भक्तराज महाराज यांनी सांगितलेले शब्द आठवले, ‘ताप आपल्याला आराम द्यायला आला आहे.’ मी रेल्वे रुग्णालयातून औषध आणले. मी दूध आणि फळे यांवर ५ दिवस राहिलो, तरी ताप न्यून होईना. ‘आधीच मला सुट्या अल्प असायच्या आणि त्यात आता ताप आल्याने सुटी मिळणार नाही. त्यामुळे माझ्या पगारात कपात होणार’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले.
७ अ ३. प.पू. भक्तराज महाराज यांचे चिंतन करून तापाला ‘येथे तू फार लाडावला आहेस, आता चालता हो’, असे म्हणून अंघोळ केल्यावर ताप त्रिविध तापांसह निघून जाणे : मी सकाळी उठून मनात श्री भक्तराज महाराज यांचे चिंतन केले आणि मनात संकल्प करून रागाने तापाला म्हणालो, ‘बुखारजी महाराज (हिंदीत तापाला ‘बुखार’ म्हणतात), आता तुम्ही येथे फार लाडावला आहात. सद़्गुरूंच्या सांगण्यानुसार आम्ही तुमची मनापासून सेवा केली. आता येथून चालते व्हा.’ असे म्हणून मी अंघोळ केली. श्री सद़्गुरूंचे चिंतन आणि आत्म्यापासून निघालेला संकल्प यांमुळे ताप घाबरला अन् त्या दिवसापासून तो जो गेला, तो आजपर्यंत आला नाही. तो जातांना त्रिविध (आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक) तापही समवेत घेऊन गेला. श्री भक्तराज महाराज यांच्या भजनामध्ये ‘तापलो मी त्रिविध तापे देवा आता सावरी ।’, अशी ओळ आहे. (क्रमशः)
– श्री. वसंत (अण्णा) धाडकर (प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त), इंदूर, मध्यप्रदेश.
(साभार : भक्तराज गारुडी आला)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर करा : https://sanatanprabhat.org/marathi/661062.html
|