रत्नागिरी : दापोलीत ११ मार्चला जीवशास्त्राविषयी आंतरराष्ट्रीय परिषद
दापोली – येथील अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने जीवशास्त्राविषयी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात सहभागी होण्याचे संबंधितांना आवाहन करण्यात आले आहे. ही परिषद ११ मार्च रोजी ऑनलाईन होणार असून, तिचा विषय फ्राँटियर्स इन बायोलॉजिकल सायन्सेस असा आहे.
परिषदेच्या पहिल्या सत्रात प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय निद्राविज्ञान संस्थेचे तांत्रिक निर्देशक अन् सल्लागार डॉ. प्रसाद कर्णिक हे ‘क्रोनोबायोलॉजी’ या विद्याशाखेतील प्रगती या विषयावर माहिती देणार आहेत.
द्वितीय सत्रात बांगलादेशातील ढाका येथील स्कूल ऑफ सायन्सेसचे डीन आणि प्राईम एशिया युनिव्हर्सिटीच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुवामोय दत्ता हे खाद्यान्नातून होणार्या रोगउद्भवाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
तिसर्या सत्रात पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेतील संशोधक डॉ. मंदार दातार हे पश्चिमी घाटातील पठारांवरच्या जैविक संपदेच्या संरक्षण आणि संवर्धनासंबंधी भाष्य करणार आहेत.
या ऑनलाईन परिषदेमध्ये अधिकाधिक संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेंद्र मोरे यांनी आवाहन केले आहे.