आयुर्वेदाच्या दृष्टीने शरिराला उटणे लावण्याचे महत्त्व
‘आपण दिवाळीच्या कालावधीमध्ये अभ्यंगस्नान करतो, म्हणजे शरिराला सुगंधी तेल लावून मग उटणे लावतो. लग्नापूर्वी नवरा-नवरी यांना हळद लावली जाते, तेही एक प्रकारचे उद़्वर्तन म्हणजे उटणेच लावणे होय. त्यानंतर मात्र उटणे लावले जात नाही. खरे तर आयुर्वेदामध्ये अभ्यंग हे नित्य करण्यास सांगितले आहे. ‘आवश्यक तेवढे तेल शरिरात जिरल्यानंतर अंगाला जो तेलकट किंवा ओशटपणा रहातो, तो निघून जाण्यासाठी तेलानंतर उटणेसुद्धा नित्य लावावे’, असे सांगितले आहे.
१. कोणते उटणे वापरावे ?
अ. आवश्यकतेनुसार विविध औषधांचा उटणे म्हणून वापर करता येतो.
आ. चंदन, हळद यांचे किंवा बाजारामध्ये निरनिराळ्या प्रकारचे उटणे मिळते; परंतु तसे विकत आणून वापरण्यापेक्षा घरच्या घरीही ते बनवता येते.
इ. घरामध्ये उपलब्ध असलेल्या एखाद्या डाळीचे पीठ घेऊन त्यात हळद घालून ते मिश्रण उटणे म्हणून वापरता येऊ शकते.
२. उटणे लावल्याने होणारे लाभ
अ. उटणे लावून अंघोळ केल्याने अंगावरचा चिकट, ओशट आणि घामेजलेपणा घालवता येतो.
आ. उटणे लावतांना त्यातील घटकांपेक्षा, ते लावण्याची क्रिया म्हणजे ‘रूक्ष द्रव्यांनी शरिराला घासणे’, ही प्रक्रिया होण्याला महत्त्व आहे. यामुळे शरिरामध्ये अतीरिक्त असणारे पाणी, कफ दोष आणि स्निग्धता अल्प होते.
इ. अतीरिक्त चरबीचे (मेदाचे) विघटन (द्रवीकरण) होते; म्हणून अनेक लोक ज्यांचे वजन, पोट आणि कंबर इत्यादी वाढलेले असते, त्यांच्यासाठी तर हा अत्यंत साधा-सोपा; परंतु परिणामकारक उपाय आहे.
ई. स्नायू आणि अंग यांमधील ढिलाई जाऊन त्यांना स्थिरत्व आणि बळ येते.
उ. त्वचा कांतीयुक्त होते. त्यामुळे उटणे हे केवळ दिवाळीच्या वेळी न लावता नियमित लावून अतीरिक्त कफ, चरबी आणि वजन अल्प करून त्वचेला आरोग्य संपन्न ठेवा !’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (२६.१.२०२३)
(ई-मेल : drsameerparanjape@gmail.com)