मुंबईमध्ये बनावट संदेशाद्वारे ४० नागरिकांच्या बँक खात्यांमधून लाखो रुपयांची लुट !

मुंबई – मागील आठवडाभरात बनावट संदेश पाठवून मुंबईतील विविध खासगी अधिकोषांतील (बँकांतील) ४० जणांच्या खात्यांमधून लाखो रुपये लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार पुढे आल्यावर ‘कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेला संदेश अथवा ‘लिंक’ (संगणकीय मार्गिका) उघडू नका’, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दूरचित्रवाहिनीवरील कलाकार श्‍वेता मेमन यांचीही अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांच्या भ्रमणभाषवर एक ‘लिंक’ पाठवून त्यामध्ये अधिकोषाच्या ‘केवायसी’ (ग्राहकांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा) आणि ‘पॅनकार्ड’ यांची माहिती अद्ययावत करण्याविषयी सांगण्यात येते. ही ‘लिंक’ उघडल्यावर अधिकोषाचे बनावट संकेतस्थळावर उघडते. त्यामध्ये ग्राहकांना खाते क्रमांक आणि त्यांचा ‘पासवर्ड’ (गोपनीय संकेतांक) टाकण्यास सांगण्यात आले. त्यांनतर अधिकोषातून बोलत असल्याचे सांगत एक महिला दूरभाषवरून ग्राहकाच्या दूरभाषवर आलेला ‘ओटीपी’ क्रमांक बनावट संकेतस्थळावर टाकण्यास सांगते. असे केल्यामुळे ग्राहकांच्या खात्याची गोपनीय माहिती चोरट्यांना प्राप्त होते. अशा प्रकारे फसवणूक होत असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात आढळून आले.